आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्राजक्त चव्हाण यांनी घेतली भेट; शिक्षकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा
सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अविनाश परीट, उपाध्यक्षपदी सतीश तवटे, तर सचिवपदी सुभाष खरात यांची निवड
कणकवली : कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) प्राजक्त चव्हाण यांनी भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसह त्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत आमदार म्हात्रे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षकांच्या समस्या, प्रलंबित मागण्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांना संघटितपणे वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून व्यापक स्तरावर काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या अनुषंगाने संघटनेची शिक्षक कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, जिल्हा व तालुकास्तरावर संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे विस्तारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी अविनाश परीट, उपाध्यक्षपदी सतीश तवटे, तर सचिवपदी सुभाष खरात यांची निवड करण्यात आली. या निवडीमुळे जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांना संघटित व्यासपीठ मिळणार असून, त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संघटनेला अधिक बळ मिळणार आहे.
या भेटीदरम्यान संघटनेचे कानडे सर, वेंगुर्लेकर सर, सर्व तालुकाध्यक्ष आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणकवली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चोडणकर सर यांचीही उपस्थिती होती.शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणे, शिक्षकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्नांना न्याय मिळवून देणे, यासाठी संघटना आगामी काळात सक्रिय भूमिका बजावणार आहे. लवकरच जिल्हा व तालुकास्तरीय कार्यकारिणीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यात येणार आहे.





Subscribe to my channel




