बळीराजाने मोदी सरकारला नमवलं ; काँग्रेसची प्रतिक्रिया

६०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा सामान्य शेतकऱ्यांनी केला पराभव

मालवण : केंद्र सरकार मार्फत लागू करण्यात आलेले तिन्ही अन्यायकारक कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. २६ नोव्हेंबर २०२० पासून जवळ जवळ वर्षभर दिल्ली सीमेवर ठाण मांडून आंदोलन करत असलेल्या देशातील बळीराजाचा हा विजय आहे. ६०० पेक्षाही जास्त शेतकऱ्यांचे बळी घेणाऱ्या केंद्र सरकारच्या दडपशाहीचा सामान्य शेतकऱ्यांनी पराभव केल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूनानक जयंती प्रकाशपर्व निमित्त देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी मोठी घोषणा करत सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. उत्तरप्रदेशच्या तीन दिवसीय दौऱ्यापूर्वी मोदींनी कृषी कायदे परत करण्याची घोषणा केली आहे. देशात होणाऱ्या भविष्यातील निवडणूकीमध्ये नुकसान होऊ नये म्हणून कदाचित मोदी आता दोन पावलं मागे येत असल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही सुधारित कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यात मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुधारित कृषी कायदे आणले असे म्हणाले. परंतु हे सर्व अंबानी व अदानी यांकरिता हे कायदे करत होते. विविध मार्गाचा अवलंब करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करूनही शेतकऱ्यांना ते समजावून सांगू शकले नाहीत. कृषी, अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी यांच्या मार्फतही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा खोटा आटोकाट प्रयत्न मोदींनी केला. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे तीन कृषी कायदे रद्द करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे जरी मोदी म्हणाले तरी जोपर्यत संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा रद्द झाल्यावर शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत काँग्रेस देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील व त्यांच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात देखील बळीराजा सोबत राहील, असे श्री. मोंडकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!