शेकडो विद्यार्थ्यांसोबत रंगणार एकाचवेळी बुद्धिबळाचा डाव

भोसले सैनिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू शरद वझे यांचा उद्या अनोखा ‘सायमल्टेनियस चेस’ उपक्रम

सावंतवाडी : बुद्धिबळाच्या पटावर एकाचवेळी शेकडो विद्यार्थ्यांना आव्हान देत, प्रत्येक पटावरील डावावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा अनोखा थरार उद्या, गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी यशवंतराव भोसले सैनिक स्कूलमध्ये अनुभवायला मिळणार आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू तथा चेस चॅलेंजर अकॅडमीचे संस्थापक शरद वझे हे शाळेतील विद्यार्थ्यांसोबत ‘सायमल्टेनियस चेस प्ले’ खेळणार आहेत. सकाळी १० वाजता सुरू होणारा हा विशेष उपक्रम सायंकाळपर्यंत रंगणार असून, शाळेच्या नालंदा सभागृहात दिवसभर बुद्धिबळाच्या चाली, डावपेच आणि विद्यार्थ्यांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

एकाच वेळी अनेक खेळाडूंविरुद्ध एकट्याने बुद्धिबळ खेळण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारासाठी शरद वझे विशेष ओळखले जातात. बुद्धिबळाचा प्रसार करणे, विद्यार्थ्यांमध्ये या खेळाची आवड निर्माण करणे तसेच बुद्धिबळाच्या माध्यमातून एकाग्रता, निर्णयक्षमता आणि बौद्धिक क्षमतेला चालना देणे, हा त्यांच्या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.

विश्वनाथ आनंद यांनी २००७ मध्ये विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर बुद्धिबळाच्या प्रसारासाठी शरद वझे यांनी १ मे २००८ पासून ‘बुद्धिबळ प्रज्ञा शोध’ हा उपक्रम सुरू केला. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये त्यांनी शाळा, संस्था आणि विविध ठिकाणी हजारो विद्यार्थी, शिक्षक व पालकांसोबत सायमल्टेनियस बुद्धिबळ सामने खेळले आहेत. आतापर्यंत आठ राज्यांमधील विविध संस्थांतील दहा हजारांहून अधिक खेळाडूंसोबत त्यांनी सायमल्टेनियस बुद्धिबळ सामने खेळल्याची नोंद आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा वेगवान खेळ. एका तासात सुमारे २० खेळाडूंसोबत सामने खेळत ते सलग अनेक तास शेकडो खेळाडूंना बुद्धिबळाचे आव्हान देतात.

प्रत्येक पटावरील डाव लक्षात ठेवणे, प्रतिस्पर्ध्याच्या पुढील चालीचा अंदाज घेणे आणि त्याचवेळी खेळाचे समालोचन करणे, या त्यांच्या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम निश्चितच वेगळा अनुभव ठरणार आहे. या उपक्रमात भोसले सैनिक स्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, त्यांना अनुभवी बुद्धिबळपटूसोबत प्रत्यक्ष सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर डावपेच, रणनीती, एकाग्रता आणि अचूक निर्णयक्षमता यांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. बुद्धिबळाच्या पटावरील शेकडो चाली आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे भोसले सैनिक स्कूलमध्ये उद्याचा दिवस बुद्धिबळमय होणार आहे.

error: Content is protected !!