शिल्पा खोत यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मालवण बंदर जेटीवरील स्वच्छतागृह झाले चकाचक

पालिका प्रशासनाला धरले धारेवर; स्पॉट पंचनाम्यानंतर स्वच्छता आणि पाणीपुरवठा सुरळीत

मालवण : मालवणच्या पर्यटनाचे प्रमुख केंद्र असलेल्या बंदर जेटीवरील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक व्यापारी व नागरिकांच्या तक्रारीनंतर शिल्पा खोत यांनी आक्रमक भूमिका घेत प्रत्यक्ष पाहणी आणि स्पॉट पंचनामा केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत स्वच्छतागृहाची स्वच्छता केली आणि पाणीपुरवठाही सुरळीत केला.

गेल्या काही दिवसांपासून बंदर जेटीवरील स्वच्छतागृहात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याने पर्यटक, स्थानिक व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. स्वच्छतागृहात पाण्याचा पुरवठा सुरळीत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. याबाबत नागरिकांनी शिल्पा खोत यांचे लक्ष वेधले. त्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. पाण्याअभावी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला जाब विचारला. “पाणी ही स्वच्छतेची मूलभूत गरज आहे. पाण्याअभावी सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था होणे ही गंभीर बाब असून, विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

यानंतर त्यांनी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावून प्रत्यक्ष स्पॉट पंचनामा केला. त्यांच्या आक्रमक पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने तातडीने हालचाली केल्या. स्वच्छतागृहाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली तसेच पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. कारवाईनंतर शिल्पा खोत यांनी नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार आणि उपस्थित कर्मचाऱ्यांचे आभार मानले. मात्र, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बंदर जेटी परिसरात स्वच्छता राखणे ही नियमित जबाबदारी असून, केवळ तक्रारीनंतरच प्रशासनाने जागे होऊ नये, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!