सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुका सोमवारी ९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आल्या आहेत. तर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद कार्यालयाच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे निवडणूक होणार आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे.



जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदासाठी खालील प्रमाणे आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. पंचायत समिती वैभववाडी- सर्वसाधारण, कणकवली- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), देवगड- सर्वसाधारण, मालवण- सर्वसाधारण (महिला), कुडाळ- सर्वसाधारण, वेंगुर्ला- नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण), सावंतवाडी- अनुसूचित जाती (महिला), दोडामार्ग- सर्वसाधारण (महिला), उपरोक्त सभापती पंचायत समिती यांचा कालावधी अडीच वर्षाचा आहे. त्यामुळे या कालावधीकरिता सभापती पदाची निवड करण्यात येईल.
सभापती पद विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असले तेव्हा त्या विशिष्ट प्रवर्गाची व्यक्ती त्या पंचायत समितीच्या कोणत्याही निर्वाचक गणातून निवडून आली असली तरी सभापती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र राहील. तेच तत्व महिला आरक्षणासाठी लागू राहील. सभापती पदाची निवडणूक झाल्यानंतर त्याच पद्धतीने उपसभापती पदाची निवडणूक घेण्यात येणार आहे. नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांना सदर सभेत उपस्थित राहण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसेच संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत नोटीसीद्वारे कळविण्यात आलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य यांना ९ मार्च २०२६ रोजी त्यांचे संबंधित पंचायत समिती कार्यालयात, सभागृहात सभापती, उपसभापती या पदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई यांचेकडील पत्रान्वये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक घेण्यासाठी पहिली बैठक दिनांक २० मार्च २०२६ पूर्वी आयोजित करण्याबाबत कळविलेले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्यांची पहिली बैठक १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे सर्वसाधारण या प्रवर्गाकरीता राखीव असून त्याचा कालावधी हा अडीच वर्षाचा आहे. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य तसेच नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती यांना या सभेस उपस्थित राहण्याबाबत या कार्यालयाकडून तसेच संबंधित तहसीलदार यांच्यामार्फत नोटिसद्वारे कळविण्यात आलेले आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद कार्यालय सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी येथे १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Subscribe to my channel




