कुडाळ-मालवणात ९ तलाठी कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर

मालवण : कुडाळ आणि मालवण तालुक्यातील जीर्ण झालेल्या तसेच स्वतंत्र तलाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध नसलेल्या तलाठी सजांसाठी आता मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून तसेच खासदार नारायणराव राणे यांच्या सहकार्याने ९ तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे.

या कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.कुडाळ तालुक्यातील ७, तर मालवण तालुक्यातील २ तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामांचा यात समावेश आहे. त्यामुळे संबंधित महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून, नागरिकांनाही महसूलविषयक कामांसाठी अधिक सुसज्ज कार्यालये उपलब्ध होणार आहेत.

कुडाळ तालुक्यात ७ तलाठी कार्यालयांना मंजुरी मिळाली असून यात गोठोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २३ लाख रुपये, आंब्रड तलाठी कार्यालय १४ लाख रुपये, कुंदे तलाठी कार्यालय १४ लाख रुपये, घोटगे तलाठी कार्यालय १४ लाख रुपये, निरूखे तलाठी कार्यालय १४ लाख रुपये, वर्दे तलाठी कार्यालय १४ लाख रुपये, सिंधुदुर्गनगरी, ओरोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २२ लाख रुपये यांचा समावेश आहे. तर मालवण तालुक्यात २ कार्यालयांना निधी मिळाला असून यात किर्लोस तलाठी कार्यालय १४ लाख रुपये, मसुरे देऊळवाडा तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय २० लाख रुपये यांचा समावेश आहे.

महसूल प्रशासनाला मिळणार बळ

ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन महसूलविषयक कामांमध्ये तलाठी कार्यालयांची भूमिका महत्त्वाची असते. सातबारा, फेरफार, उत्पन्न व रहिवासी दाखले, जमीनविषयक नोंदी तसेच विविध महसूल कामांसाठी नागरिकांचा तलाठी कार्यालयाशी नियमित संपर्क येतो. मात्र अनेक ठिकाणी कार्यालयीन इमारती जीर्ण अवस्थेत होत्या किंवा स्वतंत्र कार्यालयाची सुविधा उपलब्ध नव्हती.

या पार्श्वभूमीवर मंजूर झालेल्या नवीन इमारतींमुळे तलाठी आणि मंडल अधिकारी यांच्या कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर नागरिकांसाठीही अधिक व्यवस्थित कार्यालयीन वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीला मंजुरी

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील महसूल विभागाच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी या तलाठी कार्यालयांच्या बांधकामासाठी शिफारस केली होती. त्यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून आणि खासदार नारायणराव राणे यांच्या सहकार्याने जिल्हा वार्षिक योजनेतून या कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. एकाचवेळी ९ तलाठी कार्यालयांसाठी १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर झाल्याने कुडाळ-मालवण तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.

error: Content is protected !!