वैश्य ग्लोबल ट्रस्टच्या वतीने वैश्य उद्योजक मेळावा उत्साहात संपन्न; संस्थेच्या कार्याचे आ. जठारांकडून कौतुक
कणकवली : वैश्य समाजाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन उद्योग, कला, क्रीडा, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील वैश्य समाजबांधवांचा उद्योजक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील कोकोनट रिट्रीट सभागृहात आयोजित या मेळाव्यात उद्योजक, व्यावसायिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वैश्य समाजातील उद्योजकांना एकाच व्यासपीठावर आणणे, नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे तसेच समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीला चालना देणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश होता. ‘एकच ध्यास, वैश्य समाजाचा विकास’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचे सध्या सुमारे ७५० सदस्य असून, समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संस्था विविध उपक्रम राबवत आहे.
या कार्यक्रमाला आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संदेश पारकर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संतोष कामरेकर, उपाध्यक्ष दीपक मेजारी, सचिव रुपाली तेलवणे, खजिनदार संजय भाट, सहसचिव चंद्रकांत खाडये, विश्वस्त मनोज आंग्रे, विष्णू सातवसे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “बिज अंकुरे अंकुरे ओल्या मातीत मातीत, जसं रुजावे बियाणे माळरानी खडकात…” मुंबई, गुजरात आणि अहमदाबाद यांसारख्या ठिकाणी उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याने तेथे उद्योजकतेची बीजे सहज रुजू शकतात. मात्र, कोकणासारख्या खडकाळ मातीत उद्योजकतेची बीजे रुजविण्याचे काम करणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. प्रतिकूल परिस्थितीतही उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वैश्य ग्लोबल ट्रस्टचे मनापासून अभिनंदन करतो.
स्थानिक मातीतल्या युवकांना उद्योजक बनविण्याचे महत्त्वपूर्ण काम ही संस्था करीत आहे. कोकणातील तरुणांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःचे स्थान निर्माण केल्यास त्यांना रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. स्थानिक पातळीवर आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला युवक आपल्या गावातच सन्मानाने उभा राहू शकेल. त्यामुळे उद्योजकता ही केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून, सामाजिक स्थैर्य आणि स्थानिक विकासासाठीही महत्त्वाची आहे, असे त्यांनी नमूद केले.
“मीसुद्धा एक उद्योजक आहे. मी पहिला उद्योजक आणि नंतर राजकारणी आहे,” असे सांगत जठार यांनी उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती, आर्थिक स्वावलंबन आणि समाजाची प्रगती साधता येते. त्यामुळे युवकांनी केवळ नोकरीच्या संधींच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
वैश्य समाजातील उद्योजकांना परस्परांशी संवाद साधण्यासाठी, अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि नव्या व्यावसायिक संधी शोधण्यासाठी या मेळाव्याने महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले. समाजातील एकजूट, सहकार्याची भावना आणि नव्या पिढीमध्ये उद्योजकतेची प्रेरणा निर्माण करण्याच्या दृष्टीने हा मेळावा यशस्वी ठरला.





Subscribe to my channel




