यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात

भोसले कॉलेजच्या वतीने फार्मसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान; ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवलीचे सुहास तायशेटे यांना प्रदान

सावंतवाडी : यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी, सावंतवाडी येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. फार्मसी शिक्षणासोबतच या क्षेत्रातील गुणवंत आणि कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या भोसले कॉलेजच्या वतीने यंदाचा ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार कणकवली येथील सुहास वसंत तायशेटे यांना प्रदान करण्यात आला. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी आणि सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे माजी जिल्हाध्यक्ष आनंद रासम, दयानंद उबाळे, यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, सत्यजित साठे, डॉ. प्रशांत माळी, कणकवली तालुका केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव विवेक आपटे, स्वप्निल माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भोसले कॉलेजच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी प्रास्ताविकातून घेतला. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सत्यजित साठे यांनी भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला. भारत हा फार्मसी क्षेत्रातील प्रमुख औषध निर्यातदार देश असून या क्षेत्रातील करिअरच्या संधी सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

आनंद रासम यांनी फार्मासिस्टची बदलती भूमिका आणि या क्षेत्रातील आव्हानांवर भाष्य केले. विद्यार्थ्यांनी केवळ डिप्लोमा किंवा पदवीपर्यंत शिक्षण मर्यादित न ठेवता पदव्युत्तर शिक्षण तसेच डॉक्टरेट मिळविण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीतर्फे गेल्या बारा वर्षांपासून ‘फार्मासिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान केला जात आहे. फार्मसी व्यवसायात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीची जिल्हा असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांच्या चर्चेतून निवड केली जाते. यंदा कणकवली येथील सुहास वसंत तायशेटे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांच्या हस्ते सुहास तायशेटे यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तायशेटे कुटुंबीय गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून फार्मसी व्यवसायाशी जोडलेले असून तीन पिढ्यांनी हा वारसा पुढे नेला आहे. निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सचोटीने व्यवसाय केल्यामुळे हा सन्मान मिळाल्याची भावना तायशेटे यांनी व्यक्त केली.

अच्युत सावंत भोसले यांनी सांगितले की, भोसले कॉलेजकडून हा पुरस्कार देण्यामागे फार्मसी क्षेत्रातील आदर्श व्यक्तींच्या कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. केवळ पदवी मिळविणे हा यशाचा अंतिम टप्पा नसून, आपल्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींकडून चांगल्या गोष्टी आत्मसात करून विद्यार्थ्यांनी करिअरमध्ये पुढे जावे, असे त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमादरम्यान यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वार्षिक स्मरणिका तसेच न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले. जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त कॉलेजमध्ये पिक्टोग्राम, स्लोगन, कार्टून, रील मेकिंग आणि रांगोळी अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गौरी भिवशेट यांनी केले, तर डॉ. प्रशांत माळी यांनी आभार मानले.

error: Content is protected !!