राजकीय गणितासाठी आ. वैभव नाईक आणि कंपनीने देवबाग वासियांच्या जीवाशी खेळू नये
भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांचा सल्ला ; राणेंना श्रेय मिळू नये म्हणून नाईक आणि कंपनीची धडपड
कुणाल मांजरेकर
मालवण : पावसाळ्यात देवबाग वासियांचे प्राण आणि संसार वाचावे म्हणून कुठलीही फायद्याची गणिते न घालता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येथील बंधाऱ्यासाठी तात्काळ एक कोटी रुपये खासदार निधी जाहीर करून हा निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला. पण या लोकांचे प्राण वाचले तर त्याचे श्रेय राणेसाहेब आणि पर्यायाने माजी खासदार निलेश राणे यांना जाईल, या एकाच भीती पोटी आणि स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वैभव नाईक यांनी हा बंधारा लालफितीत अडवून ठेवला आहे. त्यामुळे स्वतःच्या राजकीय गणितासाठी आ. वैभव नाईक आणि कंपनीने देवबाग वासियांच्या जीवाशी खेळू नये, असा सल्ला भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
सदरील बंधाऱ्याची फाईल महाराष्ट्र कोस्टल झोन एथॉरिटी चेअरमन जवळ मंत्रालयात किती दिवस टाकून ठेवणार आहात ? असा सवाल श्री. चिंदरकर यांनी केला आहे. वैभव नाईक यांनी ज्या देवबाग मोबारवाडीत भूमिपूजन केलं ती फाईल सीआरझेड क्लीअरन्स घ्यायला एक वर्षापेक्षा अधिक काळ लागला, कारण त्यांना देवबाग वासियांबाबत कुठलंही देण घेणं नाही. ते फक्त मतांची बेरीज करतात. आणि त्यांच्या या गणितात देवबाग वासियांची दिवसांगणिक वजाबाकी करत आहेत. यामागे राणेद्वेषाने पछाडलेले त्यांचे वरिष्ठच झारीतले शुक्रचार्य असतील तर त्यांची नावे वैभव नाईक यांनी जनतेसमोर जाहीर करावीत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक मिळून देवबाग वासियांच्या जीवाशी खेळ खेळत असून हा प्रकार देवबागवासिय कधीही विसरणार नाहीत. ज्या एक किलोमीटरच्या फरकावर बंधाऱ्याला मंजुरी मिळाली, त्याचा डाटा तयार आहे. मग राणेंच्या खासदार निधीतून मंजूर असलेल्या बंधाऱ्याची फाईल तांत्रिक अडचणी काढून गोल गोल फिरवून मताच्या झोलमध्ये लटकावायचा विचार तर तुमच्या डोक्यात तर नाहीना ? असा सवाल करून आमदारांसह त्रिकुटाने एवढं खालच्या दर्जाचं राजकारण करू नये, अन्यथा जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे धोंडू चिंदरकर यांनी म्हटले आहे.