मालवण : घरेलू तसेच गरजू कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने ग्रामीण रुग्णालय, मालवण येथे मोफत धनुर्वात लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग घेत लसीकरणाचा लाभ घेतला.
दैनंदिन कामाच्या धावपळीत प्रतिबंधात्मक आरोग्य उपायांकडे दुर्लक्ष होणाऱ्या कामगार वर्गासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. धनुर्वातासारख्या गंभीर आजारापासून संरक्षण मिळविण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व लक्षात घेऊन लायन्स क्लबने सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविला.शिबिराच्या आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी यांच्यासह जयश्री हडकर, वैशाली शंकरदास, महेश अंधारी, गणेश प्रभुलकर व उमेश शिरोडकर यांनी सहकार्य केले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचेही शिबिरासाठी सहकार्य लाभले. सामाजिकदृष्ट्या गरजू घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासोबतच प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या लायन्स क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.