
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा पुढाकार; १ हजार शेतकऱ्यांची निवड, महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील दुग्ध व्यवसायाला अधिक सक्षम करून दूध उत्पादनात भरीव वाढ करण्यासाठी जिल्हा बँक, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद, गोकुळ, भगीरथ प्रतिष्ठान आणि दूध संस्थांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले. उपलब्ध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून दुग्ध व्यवसायाला नवी दिशा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दूध उत्पादनातील अडचणी, त्यावरील उपाययोजना आणि भविष्यातील विकासाचा कृती आराखडा याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात, ओरोस येथे विविध विभाग व दूध संस्थांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक पार पडली. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रदीप मालगावे, गोकुळ संस्थेचे अध्यक्ष गोडबोले, जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉ. समीर बिलोलीकर, भगीरथ ग्रामविकासचे प्रतिनिधी डॉ. प्रसाद देवधर तसेच जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
१० ते ११ जणांची समिती; शेतकऱ्यांना योजनांची माहिती पोहोचविण्यावर भर
अध्यक्षीय भाषणात मनीष दळवी म्हणाले की, प्रत्येक भागात १० ते ११ जणांची समिती तयार करून दूध संस्थांच्या प्रतिनिधींची प्रभावी संघटना उभी करणे आवश्यक आहे. शासनाच्या योजना, उपक्रम आणि उपलब्ध सुविधांची माहिती अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या कार्यक्षेत्रात किती शेतकरी या उपक्रमात सहभागी होऊ शकतात, याचा अभ्यास करून प्रशिक्षणाचा पहिला टप्पा तातडीने निश्चित करावा, असे त्यांनी सांगितले. ‘योजना कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे,’ यासाठी गोकुळ सकारात्मक भूमिका घेत असल्याचेही दळवी यांनी स्पष्ट केले.
१ हजार शेतकऱ्यांभोवती उभा राहणार विकासाचा क्लस्टर
जिल्ह्यातील सुमारे १ हजार शेतकऱ्यांची निवड करून त्यांच्या भोवती शेती, कृषीपूरक व्यवसाय, दुग्ध उत्पादन, गांडूळखत निर्मिती आणि इतर उपक्रम क्लस्टर पद्धतीने विकसित करण्याची गरज असल्याचे दळवी यांनी सांगितले. या उपक्रमात महिला शेतकऱ्यांची विशेष निवड करून त्यांना प्राधान्याने सहभागी करून घेण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
गणेश चतुर्थीपूर्वी कृती आराखडा; वर्षभराच्या कामाचे नियोजन
शेतकऱ्यांच्या पाठीशी कोणकोणत्या यंत्रणा प्रभावीपणे उभ्या करता येतील, उपलब्ध योजनांचा कसा उपयोग करता येईल आणि निवडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक मदत कशी उपलब्ध करून देता येईल, यावर सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन दळवी यांनी केले. गणेश चतुर्थीपूर्वी याबाबत सविस्तर चर्चा करून पुढील वर्षभराचा कृती आराखडा तयार करूया, असे आवाहन त्यांनी केले.
दुग्ध व्यवसायातील वाढत्या खर्चाबाबत बोलताना दळवी यांनी दूध संस्थांनी आपल्या नफा-तोट्याचा गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली. खर्च नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दूध संकलन करणाऱ्या प्रमुख संस्थांतील शेतकरी पहिल्या टप्प्यात सहभागीजिल्हा परिषद, भगीरथ प्रतिष्ठान, जिल्हा बँक, गोकुळ आणि दूध संस्था या सर्वांनी समन्वयाने पुढील वाटचाल करण्याचे निश्चित करण्यात आले. प्राथमिक टप्प्यात ज्या दूध संस्थांचे दूध संकलन मोठ्या प्रमाणावर आहे, त्या संस्थांशी संबंधित शेतकऱ्यांना चर्चेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. गेल्या दोन-चार वर्षांच्या तुलनेत सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीत हळूहळू सकारात्मक बदल होत असल्याचे दळवी यांनी नमूद केले. दूध उत्पादन क्षेत्राबाबत सर्व संबंधित घटकांनी एकत्र येऊन पुढे जाण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीत दूध उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देणे, शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे आणि विविध विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करणे, याबाबत सकारात्मक चर्चा झाली.






Subscribe to my channel






