
वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छतेबाबत गंभीर आरोप ; एलईडी दिव्यांच्या दराची चौकशी करण्याची मागणी
मालवण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण नगरपालिका प्रशासनाच्या नियोजनाबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शहरातील वीजपुरवठा, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, डास निर्मूलन आणि बाजारपेठेतील व्यवस्थेबाबत अपेक्षित परिणाम दिसून आला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नियोजनाच्या बैठका झाल्या, मात्र त्यातील निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील काही भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्याचे आचरेकर यांनी म्हटले आहे. जीर्ण वीजखांब, वीजवाहिन्यांवर वाढलेली झाडेझुडपे आणि मनुष्यबळाची कमतरता यांसारख्या बाबींचा परिणाम होत असून आवश्यक साहित्य उपलब्धतेबाबतही संबंधित यंत्रणेकडून माहिती घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
‘एलईडी दिवे १३०० रुपयांना का?’; चौकशीची मागणी
शहरातील स्ट्रीटलाईट व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करताना आचरेकर यांनी काही प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात एलईडी दिवे बंद असल्याचा आरोप केला. निकृष्ट दर्जाच्या दिव्यांमुळे ते लवकर बंद पडत असल्याचेही त्यांनी म्हटले. बाजारात तुलनेने कमी किमतीत एलईडी दिवे उपलब्ध असल्याचे सांगत नगरपालिका सुमारे १३०० रुपये प्रति दिवा या दराने खरेदी करत असल्यास त्यामागील दरनिर्धारण, निविदा प्रक्रिया आणि गुणवत्तेची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. दिव्यांची प्रत्यक्ष खरेदी किंमत, निविदेतील अटी आणि पुरवठ्याचा दर्जा यांची अधिकृत कागदपत्रांच्या आधारे पडताळणी व्हावी, असेही त्यांनी सुचविले.
वाहतूक नियोजनाच्या अंमलबजावणीवर प्रश्न
गणेशोत्सवापूर्वी वाहतूक, नो-एंट्री, पार्किंग आणि बाजारपेठ व्यवस्थेबाबत बैठका झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र उत्सवाच्या काळात काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवर ताण आल्याचे आचरेकर यांनी म्हटले आहे. होमगार्डकडे वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांना उपलब्ध अधिकार आणि मनुष्यबळ पुरेसे होते का, याची प्रशासनाने तपासणी करावी. बैठकीत ठरविण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झाली, याचा आढावा घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
फॉगिंगबरोबर साचलेल्या पाण्याचाही प्रश्न सोडवावा
फॉगिंग करण्यात आले असले तरी साचलेल्या पाण्याच्या समस्येवर स्वतंत्र आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचे आचरेकर यांनी सांगितले. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फॉगिंगसोबतच पाणी साचणारी ठिकाणे शोधून त्यावर उपाय करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. सांडपाणी व्यवस्थापन आणि निवासी संकुलांमधील शुद्धीकरण यंत्रणेबाबतही संबंधित विभागाने वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी त्यांनी केली.
व्यापारी आणि फेरीवाल्यांच्या व्यवस्थेवरही प्रश्न
गणेशोत्सवाच्या काळात फेरीवाले, महिला व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी जागा वाटप, नो-एंट्री आणि नो-पार्किंगचे स्पष्ट नियोजन आवश्यक होते. रिमांडिंगच्या माध्यमातून जागा देण्याबाबत चर्चा झाली होती; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे आचरेकर यांनी म्हटले.
‘बैठकीतील निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का, याची चौकशी करा’
बैठका घेणे पुरेसे नाही; बैठकीत ठरलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली का, हे तपासणे आवश्यक आहे. शहरातील वीज, स्ट्रीटलाईट, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबत नगरपालिका प्रशासनाने उपलब्ध नोंदी, निविदा कागदपत्रे आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी करून आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.







Subscribe to my channel






