भाजपचे कार्यकर्ते उत्साहात, नगराध्यक्ष पदासह सर्व २० ही जागा जिंकण्यासाठी सज्ज : देवेंद्र फडणवीस यांची मालवणात जाहीर सभा घेण्यासाठी प्रयत्न : प्रभाकर सावंत


कोणीही कितीही प्रलोभने देऊ देत, पण विकासाची वचनपूर्ती भाजपच करू शकेल : शिल्पा खोत यांचा विश्वास
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन भाजपच्या वतीने मालवण नगरपरिषद निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत व सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजप पुरस्कृत पॅनलच्या विजयाचे साकडे श्री देव रामेश्वराच्या चरणी घालण्यात आले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जि. प. उपाध्यक्ष रणजीत देसाई, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा खोत यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक पदाचे उमेदवार मंदार केणी, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, अमृता फाटक, पंकज सादये, सुवर्णा वालावलकर, रोहन पेंडुरकर, संतोषी कांदळकर, यतीन खोत, महानंदा खानोलकर, चंद्रशेखर कुशे, महिमा मयेकर, सौरभ ताम्हणकर, दीपाली वायंगणकर, संतोष शिरगांवकर, मरीना फर्नांडीस, सन्मेष परब, अन्वेशा आचरेकर, रमेश हडकर, सेजल परब तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, भाजपचे सर्व कार्यकर्ते आज उत्साहात आहेत. हा उत्साह आजचा नाही, भाजपने स्वबळावर निवडणूक लढायचं ठरवलं, त्यावेळ पासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. उत्साहपूर्ण वातावरणात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता नगराध्यक्ष पदासह सर्व २० ही जागा जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. शिल्पा खोत यांचे नाव जाहीर केल्यापासून मालवण शहरात चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळत आहे. शिल्पा खोत या सर्व सामाजिक, धार्मिक क्षेत्रात अग्रणी आहेत हिंदुत्ववादी विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे काम, महिला बचत गट अशा अनेक विचारांशी त्या निगडित आहेत. गेली अनेक वर्षे त्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यामुळेच समाजातून त्यांच्यासह भाजपच्या प्रत्येक उमेदवाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेसाठी प्रयत्न
पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरल्यानंत नियोजनाची मीटिंग झाली. जसा जसा प्रचाराला वेग येईल, तसा तसा शेवटच्या टप्प्यात एखादी जाहीर सभा मालवणात घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात दोन सभा होतील, त्यातील एक सभा मालवणात घेण्यासाठी आम्ही प्रदेशाध्यक्ष यांना विनंती केली आहे. तसेच घरोघरी संपर्क करणे व भाजपचे केंद्रात व राज्यात जे काम आहे त्याची लोकांना आठवण करून देणे यावर आमचा भर राहणार आहे. आमच्यासाठी प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शहराचा कायापलट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्हिजनरी नेतृत्व आहे, मुंबई, पुणे सारख्या शहरांचा त्यांनी कायापलट केला आहे. तसेच काम छोट्या छोट्या शहारात होईल. मालवण म्हणून विकासाचे जे मुद्दे आम्ही देऊ त्याची पूर्तता करण्याचा आमचा प्रयत्न राहील. मालवण हे पर्यटन व ऐतिहासिक शहर आहे. हे अधिक सुंदर करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने आम्ही करू, असे ते म्हणाले.
यावेळी सौ. शिल्पा खोत म्हणाल्या, मालवण शहराचे ग्रामदैवत रामेश्वर नारायणाच्या चरणी आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ केला आहे.मालवणचा विकास हे व्हिजन घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. भाजप हा व्हिजनरी असणारा पक्ष आहे. पुढील दोन ते तीन वर्षात मालवणचे सगळे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे. मालवण ची जनता सुज्ञ आहे. मालवणचा विकास हा फक्त आणि फक्त सत्तेवर असणारा भाजपच करू शकतो. किनारपट्टी भागापासून मालवणचा मध्यवर्ती भाग व ग्रामीण भागाचा विकास करत विकासासाठी जास्तीस जास्त निधी भाजपच आणू शकेल. कोणीही कितीही प्रलोभने देऊ देत किंवा काहीही सांगूदेत, पण विकासाची वचनपूर्ती भाजपच करू शकेल. जनतेचा प्रतिसाद पाहता विकासातूनच आम्ही यश दाखवून देणार आहोत, असे त्या म्हणाल्या. यावेळी विजय केनवडेकर, बाबा परब, विकी तोरसकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, रश्मी लुडबे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Subscribe to my channel




