
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रतिपादन
सिंधुनगरी : “आम्ही जिल्हा बँकेचे मालक नाही, तर विश्वस्त आणि चालक आहोत. आमच्याकडे सोपविलेली जबाबदारी पुढच्या पिढीकडे अधिक सक्षम स्थितीत सोपविणे, हेच आमचे ध्येय आहे. सहकाराला समृद्धी देत त्यातून सिंधुदुर्गची समृद्धी साध्य करण्यासाठी यापुढेही एकजुटीने काम करू,” असा निर्धार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला. गेल्या साडेचार वर्षांत बँकेने १७ ते २० टक्क्यांपर्यंत व्यवसाय वाढ साध्य करून व्यवसाय, नफा व उत्पन्न दुपटीपर्यंत नेण्यात यश मिळविले असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहक, शेतकरी, महिला व युवकांना अधिक सक्षम सेवा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयात दळवी यांच्या ४५व्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक गजानन गावडे, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, विठ्ठल देसाई, प्रकाश मोरये, आत्माराम ओटवणेकर, समीर सावंत, गणपत देसाई, विद्याधर परब, व्हीक्टर डान्टस,संदिप परब, विद्याप्रसाद बांदेकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह जिल्हाभरातील बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना दळवी म्हणाले, वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा पुढील कामासाठी ऊर्जा देतात; मात्र त्याचबरोबर जबाबदारीही वाढवितात. शुभेच्छांसोबत व्यक्त होणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपल्या पदाचा उपयोग केवळ दैनंदिन कामकाजापुरता न करता समाजाच्या हितासाठी कसा करता येईल, याचा विचार करण्याचे मार्गदर्शन ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांनी वेळोवेळी केले. त्यातूनच संस्थेच्या कामकाजाला व्यापक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. उपाध्याय, संजू परब, विद्यारसाद बांदेकर, गजानन गावडे, नागेश मोर्य यांनी विचार व्यक्त करीत दळवी यांच्या सहकारातील नेतृत्वाचे गुणगान गायले.

पाच वर्षांत व्यवसायवाढीचा वेग कायम
गेल्या पाच वर्षांत जिल्हा बँकेचा व्यवसाय, कर्ज व्यवहार, आर्थिक उलाढाल, नफा आणि उत्पन्न दुपटीपर्यंत नेण्यात यश आले. या काळात बँकेने सातत्याने १७ ते १८ टक्के, तर काही वर्षांत २० टक्क्यांपर्यंत व्यवसायवाढ साध्य केली. ही कामगिरी केवळ संचालक मंडळाची नसून बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे फलित असल्याचे दळवी यांनी सांगितले. “आम्ही केवळ दिशा दिली; त्या दिशेने वेगाने वाटचाल करण्याचे काम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले,” असे सांगत त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक केले.
नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार
बदलत्या काळानुसार बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यावर भर दिला आहे. ग्राहक, शेतकरी, महिला आणि युवकांना बँकेशी व्यवहार करणे सुलभ व्हावे आणि आधुनिक सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढविण्यात येत आहे.टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे. नवीन तंत्रज्ञान स्वीकारताना कर्मचाऱ्यांनी कोणतीही नकारात्मक भूमिका घेतली नाही, तर ते आत्मसात करण्याची तयारी दाखविली, असे दळवी यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे स्वतःचे सीबीएस सेंटर असून, ते जिल्ह्यातीलच कर्मचाऱ्यांकडून चालविले जाते. अनेक कर्मचारी क्लार्क म्हणून रुजू झाल्यानंतर तांत्रिक कौशल्य आत्मसात करून सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या बरोबरीने काम करण्याइतके सक्षम झाले आहेत. बँकेच्या प्रगतीचे खरे श्रेय अशा मेहनती अधिकारी-कर्मचाऱ्यांना असल्याचे दळवी यांनी नमूद केले.

राजकारण बाजूला ठेवून संस्थेला प्राधान्य
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात विविध राजकीय पक्षांतील प्रतिनिधी असले तरी संस्थेच्या हितासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम केले. ही कोणाची वैयक्तिक संस्था नसून जिल्ह्यातील शेतकरी, गरीब शेतकरी, उद्योजक, व्यावसायिक आणि महिलांची संस्था आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून बँकेच्या विकासाला प्राधान्य दिले, असे दळवी यांनी स्पष्ट केले.
दुसऱ्या पिढीचे नेतृत्व स्वीकारणे ही मोठी बाब
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आणि अनेक वर्षे बँकेच्या संचालक मंडळात काम केलेल्या अनुभवी संचालकांनी आपले नेतृत्व स्वीकारून साथ दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही विश्वास ठेवून काम केले. दुसऱ्या पिढीचे नेतृत्व स्वीकारणे आणि त्याला सोबत घेऊन पुढे जाणे ही सोपी गोष्ट नसते; मात्र जिल्हा बँकेत हा समन्वय साधला गेला, याचा विशेष उल्लेख दळवी यांनी केला. ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनामुळे बँकेला व्यापक दृष्टिकोन मिळाला. पूर्वीच्या ज्येष्ठ नेतृत्वाने निर्माण केलेली संस्थेची ओळख पुढे नेत जिल्हा बँकेला महाराष्ट्रातील अभिमानाची संस्था बनविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सहकारातून जिल्ह्याची समृद्धी’
यापुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान, ग्राहकाभिमुख सेवा, शेतकरीहित, महिला सक्षमीकरण आणि युवकांना संधी या बाबींना केंद्रस्थानी ठेवून बँकेला आणखी सक्षम करण्याचा संकल्प दळवी यांनी व्यक्त केला. “ही बँक केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था न राहता सिंधुदुर्गच्या सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक प्रगतीची साथीदार बनावी. सहकाराला समृद्धी देणे आणि त्या समृद्धीतून जिल्ह्याची समृद्धी साध्य करणे, हेच आपले सामूहिक उद्दिष्ट असले पाहिजे,” असे दळवी म्हणाले. आजवरच्या वाटचालीत साथ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याची जाणीव मनात ठेवून पुढील काळातही काम करत राहू. आपल्यावर व्यक्त झालेला विश्वास सार्थकी लावण्याची ग्वाही देत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.





Subscribe to my channel






