
शेतकऱ्यांशी संवाद साधत जाणून घेतली कैफियत; ‘शासन तुमच्या पाठीशी’चा दिला विश्वास
मळगाव, होडावडा येथे विहिरी व नदीच्या पाणीपातळीची प्रत्यक्ष पाहणी; पंचनामे वेगाने पूर्ण करण्याचे प्रशासनाला निर्देश
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी रविवारी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत त्यांनी भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि नुकसानीची माहिती जाणून घेतली. ‘शासन तुमच्या पाठीशी आहे’, असा विश्वास देत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने आणि वेगाने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मळगाव तसेच होडावडा परिसरात पालकमंत्री राणे यांनी भातशेतीची पाहणी करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आणि नदीतील पाण्याची पातळीचीही प्रत्यक्ष पाहणी केली. पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची वस्तुस्थिती जाणून घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.यावेळी शेतकऱ्यांनी भात पिकावर झालेल्या परिणामांची कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडली. पाऊस कमी पडल्याने भाताचा ‘अवा’ अपेक्षित प्रमाणात वाढलेला नाही, अनेक ठिकाणी फुटवे आलेले नाहीत, तर पसवलेल्या भातातही दाणा भरण्याची स्थिती समाधानकारक नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
काही भागात पिके करपल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.पावसाच्या खंडाचा भात पिकाला मोठा फटका बसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतही स्पष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे पालकमंत्री राणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, नुकसानीचे योग्य मूल्यांकन करून नियमानुसार मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठही तालुके दुष्काळाच्या प्रथम स्थितीत अर्थात ‘ट्रिगर-१’ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रिगर-१ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या सवलती आणि उपाययोजनांचा लाभ शेतकऱ्यांना प्राधान्याने व तातडीने मिळावा, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्री राणे यांनी प्रशासनाला दिले. तसेच पीक नुकसानीचे पंचनामे कोणत्याही विलंबाशिवाय वेगाने पूर्ण करावेत, शेतकऱ्यांना आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, लघु पाटबंधारे विभागाचे संतोष शिरोडकर, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अधिकारी सुदेश राणे, संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.







Subscribe to my channel






