धामापूर तलावात भगवती मंदिरानजीक मृत माशांचा खच ; जाणकार ग्रामस्थ म्हणतात देवीचा “प्रकोप” !

१७ मार्च पासून अंतर्गत वादामुळे भगवती मंदिर प्रशासनाने केलंय कुलूपबंद ; देवीची पूजा अर्चाही बंद

पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले ; धामापूर नळपाणी योजनेचे पाणी उकळून पिण्याचे नगरपालिकेचे आवाहन

मालवण : तालुक्यातील प्रसिद्ध आणि शेकडो वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा असलेल्या श्री देवी भगवती मंदिराशेजारील धामापूर तलावात गेल्या चार दिवसांपासून अचानक आणि मोठ्या प्रमाणावर लहान, मोठे मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे. अचानक मासे मृत होण्यामुळे संपूर्ण तलावाच्या काठावर मेलेले मासे तरंगत येऊन मृत माशांचा खच पडला आहे आणि संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच पाण्याचा रंगही काही प्रमाणात काळसर झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.

दरम्यान, धामापूर भगवती मंदिर आणि तलावाच्या सुमारे ४५० ते ५०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच अशी घटना घडल्याचे स्थानिक जाणकारांनी सांगितले. एवढ्या मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत कसे झाले हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु १७ मार्च २०२२ पासून गावकऱ्यांमधील अंतर्गत वादावरील न्यायालयीन प्रक्रियेमुळे देवी भगवती मंदिर कुलूपबंद करण्यात आले आहे. पर्यायाने तेव्हापासून मंदिराच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस देवी भगवतीची नित्यपुजा बंद आहे. या प्रकारामुळेच देवीचा प्रकोप झाला असावा आणि सध्याची अघटीत परिस्थिती निर्माण झाली असावी अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये सुरू आहे. तर काही जणांनी वाढत्या उष्णतेमुळे मासे मृत झाले असण्याची शक्यता वर्तविली आहे.

दरम्यान धामापूर तलावाचे पाणी धामापूर , काळसे, गावांसह संपूर्ण मालवण शहराला पिण्यासाठी नळयोजनेमार्फत पुरविले जाते. परंतु आता तलावात आणि काठावर लाखो मासे मरुन पाण्यावर तरंगत असल्याने पाणी दूषित झाले असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. काळसे ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण काळसे गावात दवंडी पिटून धामापूर तलाव नळयोजनेचे पाणी वापरणाऱ्या नागरिकांना नळाचे पाणी पिण्यासाठी न वापरण्याचे आणि पाणी निर्जंतुक करून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काळसे सरपंच केशव सावंत आणि आरोग्य सेवक गणेश जाधव यांनी आज सकाळी तलावाकाठी जाऊन मृत मासे आणि पाण्याची पाहणी केली.
यावर लघुपाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पाण्याची तपासणी करावी आणि मृत मासे तलावातून बाहेर काढून पाणी शुद्धीकरण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

धामापूर नळपाणी पुरवठा योजनेच्या धामापूर येथील तलावात अचानकपणे मासे मृत झाल्याने पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे शहरात या नळपाणी योजनेच्या नळधारकांनी तसेच शहराबाहेरील कुंभारमाठ, शासकीय तंत्रनिकेतन येथील सर्व नळ धारकांनी पुढील काही दिवस पाणी उकळून व निर्जंतुकीकरण करून घ्यावे असे आवाहन मालवण पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3849

Leave a Reply

error: Content is protected !!