प्रकरण उघडकीस आणणाऱ्या मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांना युके वरून धमकावणीचा फोन

मालवण : मालवण शहर आणि नजिकच्या काही गावात एका विशिष्ट समुदायाकडून हिंदु समाजातील गरीब गरजू लोकांना आर्थिक प्रलोभने दाखवून त्यांचे अनधिकृत पणे धर्मांतरण करण्यात येत असल्याच्या प्रकाराची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या मनसे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांना जाब विचारण्यासाठी थेट यु के वरून फोन आल्याचा प्रकार घडला आहे. तुम्ही सुरु केलेले प्रकार तातडीने थांबवा अशी धमकीवजा सूचना समोरील व्यक्ती कडून मिळाली असून हे प्रकार जोपर्यंत बंद होत नाहीत, तोपर्यंत आपण धर्मांतरण प्रकरणी सनदशीर मार्गाने लढा सुरु ठेवणार असल्याचे श्री. अन्ननसिएशन यांनी म्हटले आहे.
गॅरी अन्ननसिएशन यांनी मंगळवारी सकाळी मालवण पोलिसांची भेट घेऊन मालवण शहर आणि तालुक्यात काही व्यक्ती व संघटनांकडून नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून, आर्थिक मदत, नोकरी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा अथवा इतर लाभांचे आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करत धर्मांतरण केले जात असल्याच्या बाबत निवेदन सादर करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. अशा प्रकारांमुळे मालवण परिसरातील सामाजिक सलोखा, शांतता व कायदा-सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सदर गंभीर प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. संबंधित व्यक्ती, संस्था किंवा संघटनांच्या कार्यपद्धतीची तपासणी करण्यात यावी. नागरिकांना आमिषे दाखवून किंवा दबाव टाकून धर्मांतरण केले जात असल्यास त्याची सखोल चौकशी करावी. परवानगीशिवाय सभा, मेळावे किंवा प्रचार कार्यक्रम आयोजित केले जात असल्यास त्यांची देखील तपासणी करुन कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. असे सांगितले होते.
या निवेदनाच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत निश्चित पणे या प्रकरणाची चौकशी करू, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली होती.
मालवणमध्ये सुरू असलेल्या धर्मांतरण बाबत आपण येथील पोलिसांना लेखी निवेदन सादर केले आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील जाऊन याबाबतची माहिती दिली आहे. अनधिकृतपणे सुरू असलेले हे प्रकार थांबलेच पाहिजेत, जेणेकरून येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी ही आपली यामागील भूमिका आहे. या धर्मांतरण प्रकरणाची माहिती मनसे नेते संदीप दळवी, आमचे सर्वोच्च नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत देखील पोहोचविली असून कोणीही कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी आपण मागे हटणार नाही असे गॅरी अन्ननसिएशन यांनी म्हटले आहे.
या निवेदनाच्या दुसऱ्याच दिवशी कोल्हापूर येथून एका व्यक्तीने गॅरी यांना व्हाट्सअप कॉल करुन तुम्ही एका समुदायची बदनामी करत आहात. मी ह्युमन राईटचे काम करत असून तुम्ही दुसऱ्यांच्या मानवाधिकाराचे हनन करत आहात, त्यामुळे हे बंद करा अशी सूचना संबंधिताने दिली. मात्र गॅरी यांनी अनधिकृत पणे सुरु असलेले धर्मांतरण बंद झालेच पाहिजे अशी ठाम भूमिका घेतल्यानंतर संबंधिताने आपला फोन बंद केला.
यानंतर दोन दिवसांनी गॅरी यांना रात्री १२. ३० वाचण्याच्या सुमारास थेट युकेवरून फोन करण्यात आला. यामध्ये देखील मालवणमध्ये तुम्ही सुरू केलेले प्रकार तात्काळ थांबवा. अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देण्यात आली.







Subscribe to my channel






