मनसेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन

अन्यायाविरुद्ध मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा : प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांचे आवाहन

मालवण : मागील बऱ्याच कालावधी पासून रिक्त असलेल्या मनसेच्या प्रभारी मालवण तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसेच्या सोमवारी मालवण येथील मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख संदीप दळवी यांच्या उपस्थितीत ही निवड जाहीर करून त्यांचा सत्कार करण्यात आला.

आज समाजात सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही. त्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला पाहिजे, असे संदीप दळवी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

मालवण येथे मनसेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यात पक्षाचे प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून गॅरी अन्ननसिएशन यांची निवड करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्ष मोनिका फर्नांडिस, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, शहराध्यक्ष सागर जाधव, जेनिफर अन्ननसिएशन यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दळवी म्हणाले, ज्या कर्नाटकात मराठी माणसांवर अन्याय आणि मारहाण होत आहे, त्याच कर्नाटकचा आंबा आपण विकत घेत आहोत, हे कुठेतरी थांबायला हवे. आपला पैसा कर्नाटकात जाण्याऐवजी, आपण स्थानिक मराठी शेतकऱ्यांच्या मालाला प्राधान्य देऊन तोच विकत घेतला पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी काळात मनसेमध्ये अनेक नवीन बदल केले जाणार असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

ते पुढे म्हणाले की, जिल्ह्याला राज्याचे मत्स्योद्योग मंत्री लाभले असले, तरी अजूनही स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न प्रलंबितच आहेत. जिल्ह्यात परप्रांतीयांचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, स्थानिक प्रशासनाने आणि नागरिकांनी हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी केवळ मनसे प्रमुख राज ठाकरे हेच प्रामाणिकपणे लढा देत असून, पक्षाचे विचार जिल्ह्यातील गावागावात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे, असे आदेश त्यांनी दिले.

धीरज परब म्हणाले, स्थानिक पातळीवर सविस्तर चर्चा करून लोकांच्या मनातील विचार ओळखूनच गॅरी अन्ननसिएशन यांच्यावर मालवण तालुकाध्यक्ष पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुंबईत असो वा कोकणात, जिथे अन्याय होईल, तिथे मनसेचा आवाज कडाडलाच पाहिजे. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. राजकीय ताकद आणि सत्तेचा गैरवापर करून, ईडी किंवा इतर चौकशांच्या माध्यमातून पक्षांचे दोन-दोन तुकडे केले जात आहेत. महाराष्ट्राची जनता या घाणेरड्या राजकारणाला कंटाळली आहे. हे विस्कटलेलं राजकारण सावरणारा एकच आशेचा किरण आज महाराष्ट्राला दिसतोय, ते नेतृत्व म्हणजे राज ठाकरे होय. इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य माणूस होरपळत असताना कार्यकर्त्यांनी केवळ राजकारण न करता समाजकारण करावे, लोकांच्या सुख-दुःखात आधी धावून जावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सौ. मोनिका फर्नांडिस म्हणाल्या, संदीप दळवी यांच्या रूपाने जिल्ह्याला एक खंबीर नेतृत्व मिळाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे जाळे अधिक मजबूत होईल. आपला जिल्हा आणि आपले गाव आपणच सांभाळले पाहिजे, नाहीतर परप्रांतीयांच्या लोंढ्यामुळे आपल्या मतदारसंघांवर आणि संस्कृतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल. या मातीतील जागांवर आणि व्यवसायांवर पहिला अधिकार आपल्या स्थानिक युवा पिढीचा असायला हवा. कुणावरही अन्याय होत असल्यास भीती न बाळगता आवाज उठवण्याचे आणि मनसैनिकांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी स्थानिक जनतेला केले..

नूतन तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी तालुक्यात मनसे संघटना वाढविण्यावर भर देणार आहे. यापुढे जे काय करणार ते आपल्या कामातून दाखवून देऊ असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांनी केले. आभार शहराध्यक्ष सागर जाधव यांनी मानले.

error: Content is protected !!