

कट्टा येथे क्रिकेट सामन्या दरम्यान अत्यवस्थ बनलेल्या सुभाष गिरकर यांचा दुर्दैवी मृत्यू
मालवण : सध्या राज्यात उष्माघाताची प्रचंड लाट पसरलेली असून प्रत्येक व्यक्तीने आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी शक्य असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आवाहन शासनाने केले आहे. या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाड येथील काराणेवाडी येथील मैदानावर टेनिस बॉल क्रिकेट सामन्या दरम्यान बुधवारी दुपारी १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास सुभाष दत्तात्रय गिरकर (वय ४५) हा सामना खेळत असताना अत्यवस्थ होऊन मैदानावर कोसळला. त्याला उपचारासाठी मैदानावरून ग्रामीण रुग्णालय पेंडूर येथे नेण्यात आले. त्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची प्रकृती खालावली असल्याने त्याला अधिक उपचारासाठी पुढे नेण्याचा सल्ला दिला. यावेळी सोबत असलेल्या मित्रपरिवाराने व आयोजक यांनी त्याला अधिक उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले.
मयत सुभाष गिरकर ह्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. उष्माघाताची प्रचंड लाट असताना आणि प्रत्येकांनी आपल्या तब्येतीची खबरदारी घ्यावी असे आवाहन केले असतानाही क्रिकेट खेळणे एवढे गरजेचे होते का ? आणि त्यात करून अशा मे महिन्यात कडक उन्हाळ्यात क्रिकेट सामने भरविलेच का ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. घडलेली घटना ही अत्यंत वाईट व दुर्दैवी आहे परंतु जर क्रिकेट सामने भरविलेच नसते तर कदाचित ही दुर्दैवी घटना टाळता आली असती असे मत सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केले. सुभाष गिरकर हे कट्टा बाजारपेठ येथील रेशनिंग दुकानावर कामाला होते. त्यातून ते आपला संसाराचा चरितार्थ चालवत होते. त्यांचा मुलगा लहान असून तो वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. त्यांची पत्नी विद्या गिरकर ही वरची गुरामवाडी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत आहे. सुभाष हे अत्यंत नम्र व मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्ती होते. रेशनिंग दुकानावर ते प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने मदत करायचे. वयोवृद्ध व्यक्तींना ते नेहमी प्रत्येक बाबतीत सहकार्याची भूमिका ठेवायचे. त्याच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली. काहींनी तर ही बातमी समजताच क्रिकेटच्या मैदानात तर काहींनी रुग्णालयात धाव घेतली होती. परंतु त्याच्या जाण्याने मित्रपरिवारात एकच शोककळा पसरली. मित्रपरिवारातील अनेक व्यक्तींना त्याच्या जाण्याने अश्रू अनावर झाले होते. गुरुवारी येथील स्थानिक स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
क्रिकेट सामने भरविलेच नसते तर ?
आजच्या तरुणाईला क्रिकेट सामन्याचे बरेच वेड लागले आहे. बरेच जण ग्रुप करतात आणि असे सामन्याचे आयोजन करतात. त्यातून आपण पुढची पिढी घडवतो की बिघडवतो ह्याचा विचार कोणीच करत नाही. आयोजक असो अथवा बक्षीस देणारे स्पॉन्सर असो पैसा वाया जातोय की नेमका सत्कर्मी लागतोय ह्याचा विचार पण करत नाही. सामने खेळविणे हे निश्चितच गैर नाही परंतु सामने खेळण्याची वेळ मात्र निश्चितच चुकली त्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली. हे म्हणणे वावगे ठरणार नाही.



Subscribe to my channel




