मंत्री आशिष शेलार यांच्या दालनात बैठक, पालकमंत्री नितेश राणेंसह अधिकारी, भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; नांदोस गढी, भगवंतगड, रामगड परिसराचा होणार विकास


मुंबई : मालवण तालुक्यातील नांदोस गढी, भगवंतगड, रामगड आदी गड किल्ल्यांची डागडुजी जतन व संवर्धन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून होण्याच्या दृष्टीने मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या दालनात महत्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत वरिष्ठ अधिकारी व भाजपचे मालवण तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण तालुक्यातील २८ गुंठे क्षेत्रफळ असलेल्या नांदोस गढीचे शास्त्रीय पद्धतीने उत्खनन करून त्यातील ऐतिहासिक वारसा जगासमोर आणण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उत्खननासाठी लागणारा निधी मंजूर करून कामाला तात्काळ सुरुवात होणार आहे. तसेच सिद्धेश्वर मंदिर परिसरासह सुमारे २.५ एकर क्षेत्रफळातील भगवंतगडवरील संवर्धन आणि जतनासाठी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून अहवाल तयार करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

मालवण तालुक्यातील ५ एकर क्षेत्रफळ असलेला रामगड किल्ला त्याच्या वास्तुशास्त्रीय, धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे ‘राज्य संरक्षित वास्तू’ घोषित करण्यात येणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. स्थानिक ग्रामपंचायती, जिल्हा परिषद सदस्य आणि खाजगी जमिनींचे मालक यांच्या संमतीने हे तिन्ही उपक्रम राबवले जाणार आहे. या बैठकीस मत्सोद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, पुरातत्व विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, उपसचिव नंदा राऊत तसेच भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, चिंदरचे उपसरपंच महेंद्र मांजरेकर, नांदोस उपसरपंच विजय निकम, संतोष गावकर, हेमंत दळवी, शुभम मटकर, ग्रामसेवक सरिता धामापूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.
















Subscribe to my channel




