८० बॉक्स दारू पोलिसांच्या ताब्यात; तिघांविरोधात गुन्हा दाखल
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली मालवण पोलिसांची धडक कारवाई
मालवण : मालवण शहरातील दांडी परिसरात सुरू असलेल्या अवैध दारूविक्रीविरोधात मालवण पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचा तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. शनिवारी (३१ ऑक्टोबर) रात्री करण्यात आलेल्या या धडक कारवाईत दारूचे तब्बल ८० बॉक्स पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी रेबिका फर्नांडिस आणि इतर दोन जण अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
मालवण शहरातील दांडी परिसरात गोवा बनावटीच्या दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्री परिसरात छापा टाकला. यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूचा साठा आढळून आला. तपासणीदरम्यान दारूचे एकूण ८० बॉक्स जप्त करण्यात आले. या जप्त केलेल्या मद्यसाठ्याची किंमत ५ लाख ३८ हजार रुपये आहे. या प्रकरणी संबंधित तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगत, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलीस हवालदार सुहास पांचाळ आणि पोलीस हवालदार सुप्रिया पवार यांनी सहभाग घेतला.




Subscribe to my channel




