शहरअध्यक्ष, माजी नगरसेवकांनीही फिरवली पाठ ; केवळ नगरसेवकच उपस्थित


मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेच्या तुलनेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे बेस केडर असतानाही नगरपालिका निवडणुकीत मालवण शहरात भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला. या धक्क्यातून भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी अद्याप सावरले नसताना आता मालवण शहरात भाजप मध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. त्याचा प्रत्यय सोमवारी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी आयोजित बैठकीच्या निमित्ताने दिसून आला. या सभेत भाजपच्या कोट्यातून एक स्वीकृत सदस्य निवडला गेल्यानंतरही त्याचे अभिनंदन करण्यासाठी भाजपचा एकही पदाधिकारी याठिकाणी फिरकला नाही. शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांच्यासह पालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक देखील यावेळी अनुपस्थित राहिले. त्यामुळे भाजपचे निवडून आलेले नगरसेवक एकाकी पडल्याचे दिसून आले.
मालवण नगरपालिकेच्या मागच्या निवडणुकीवेळी भाजपचे ५ नगरसेवक निवडून आले होते. यात तत्कालीन उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, आप्पा लुडबे, पूजा करलकर, पूजा सरकारे यांचा समावेश होता. तर काही कालावधी नंतर उबाठाचे पंकज सादये, सेजल परब, दर्शना कासवकर तसेच मंदार केणी, यतीन खोत, सुदेश आचरेकर हे सहा नगरसेवक भाजपवासी झाले. त्यामुळे शहरात भाजप मजबूत पक्ष बनला होता. त्यामुळेच नगरपालिका निवडणुकीत भाजपला शिवसेनेशी युती करण्यात जास्त स्वारस्य नव्हते.
मात्र प्रत्यक्षात पालिका निवडणुकीवेळी भाजपकडे संघटनात्मक ताकद असताना देखील केवळ पाच जागांवर भाजपला विजय मिळवता आला. गणेश कुशे, यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब या चार नगरसेवकांसह काही दिग्गजाना पराभव पत्करावा लागला. तर माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आप्पा लुडबे यांना आरक्षण व बदललेल्या वॉर्ड रचनेत उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे भाजपकडून स्वीकृत सदस्य पदासाठी इच्छुकांची भाऊगर्दी होती.
आज झालेल्या स्वीकृत सदस्य निवडीवेळी शिवसेनेला एक तर भाजपला एक स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर भाजप श्रेष्ठींनी संघटन मजबूतीच्या दृष्टीने मच्छिमार लढ्यात अग्रणी असलेल्या रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांचे नाव निश्चित केले. मात्र त्यानंतर भाजपात नाराजीनाट्य दिसून आले आहे. भाजपचा एकही पदाधिकारी, कार्यकर्ता आजच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडीसाठी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही. तसेच माजी नगरसेवक व दस्तुरखुद्द शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.
श्री. मोंडकर यांनी पालिका निवडणुकीत आपली पत्नी भाजप महिला शहर उपाध्यक्ष वैष्णवी मोंडकर यांच्यासाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना तिकीट मिळू शकले नव्हते. त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पदासाठी त्यांनी पत्नी सौ. वैष्णवी यांचे नाव इच्छूक म्हणून दिले होते. मात्र यावेळी देखील त्यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे बाबा मोंडकर नाराज आहेत का ? असा सवाल उपस्थित झाला आहे. भाजपच्या काही सक्रिय पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाकडे दिल्याचे वृत्त असून पक्षात सुरु असलेल्या या नाराजी नाट्याचा येत्या दोन चार दिवसात स्फ़ोट होणार असल्याची चर्चा देखील सुरु आहे. त्यामुळे या नाराजी नाट्यावर भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी तोडगा कसा काढणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
















Subscribe to my channel




