नवोदयसाठी नियमबाह्य प्रवेश ; मालवणात युवासेना आक्रमक
मालवण तालुक्यातील ‘त्या’ शाळेची केली पोलखोल ; शिक्षण विभागाकडे करणार तक्रार
मालवण : मालवण तालुक्यात हमरस्त्यावर असणाऱ्या एका माध्यमिक शाळेत परजिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांना देण्यात आलेला प्रवेश हा नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठीच नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचे सांगत मालवण तालुका युवासेनेच्या माध्यमातून “त्या” शाळेत धडक देण्यात आली. या प्रकरणी पंचायत समिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांचेही युवासेना व शिवसेना पदाधिकारी यांनी लक्ष वेधले असून शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करणार असल्याची माहिती युवासेना मालवण शहरप्रमुख मंदार ओरसकर व माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिली आहे.
या धडक मोहिमेत शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, संमेश परब, नरेश हुले, प्रसाद आडवणकर, मनोज मोंडकर, यशवंत गावकर, उमेश मांजरेकर, रोहित पालव, सचिन गिरकर यासह अन्य उपस्थित होते. नियमबाह्य प्रवेश बाबत संस्था पदाधिकारी यांच्याही निदर्शनास ही बाब घालण्यात आली आहे. नियमानुसार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवोदय (सहावी) शाळा प्रवेशासाठी पाहिले प्राधान्य दिले जाते. सलग तीन वर्षे विद्यार्थी जिल्ह्यातील शाळेत शिकत असला पाहिजे, असे असताना कोल्हापूर तालुक्यातील १९ विद्यार्थी यावर्षी मालवण तालुक्यातील पाचवी वर्गात दाखवण्यात आले. प्रत्यक्षात हे विद्यार्थी उपस्थित नव्हतेच. मात्र शनिवार ३० एप्रिल रोजी नवोदय शाळा प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षा यादीत हे १९ विद्यार्थी आहेत. ही बाब युवासेना पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणली. जिल्ह्यातील अन्य काही तालुक्यातील काही शाळांत असे प्रकार उघडकीस आले असून सुमारे शेकडो बोगस विद्यार्थी दाखवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे विद्यार्थी नवोदय सारख्या ठिकाणी शिक्षण घेण्यास इच्छुक आहेत, ते पात्र ठरण्यापासून वंचित राहत आहेत. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय दूर होण्यासाठी आमचा लढा सुरू आहे. नियमबाह्य पद्धतीने मुलांना शाळेत प्रवेश देणाऱ्या मुख्याध्यापक व संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आली.
शिवसेना पदाधिकारी यांनी आज संबंधित शाळेत धडक दिली. यावेळी पाचवी वर्गात त्या विद्यार्थ्यांचा शोध घेतला असता पाचवी वर्गास शाळेने सुट्टी दिल्याचे समजले. परजिल्ह्यातील जे १९ विद्यार्थी यावर्षी शाळेत प्रवेश दाखवले होते त्यांची नावे शाळेत वाचून दाखवली असता त्या नावाचे विद्यार्थी शाळेत येत नसल्याची गंभीर बाब पुढे आली. याचा अर्थ परजिल्ह्यातील विद्यार्थी बोगस पद्धतीने कागदोपत्री दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. शाळा पटसंख्यासाठी परजिल्ह्यातील प्रवेश घेतात असे सांगत मुख्याध्यापक यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना पदाधिकारी आक्रमक राहिले.
“त्या” विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देणार नाही
नवोदय प्रवेशासाठी शनिवारी ३० एप्रिल रोजी मालवण केंद्रावर प्रवेश परीक्षा होणार आहे. या परीक्षेला जिल्ह्याबाहेरील ती १९ मुले बसता नये. याबाबत योग्य ती कार्यवाही शाळेने करावी अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने पुढील दिशा ठरवावी लागेल. असेही युवासेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे.