महाराष्ट्र बंद वरून निलेश राणेंनी महाविकास आघाडीला फटकारले !
जनतेचा अंत बघू नका, नाहीतर उद्रेक कधी होईल सांगता येत नाही
महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही, हे दाखवण्यासाठी बाहेर पडण्याचे आवाहन
कुणाल मांजरेकर
महाविकास आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद वरून भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. राज्यातील लोकं सध्या वैतागली आहेत. त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका, नाहीतर जनतेचा उद्रेक कधी होईल, हे सांगता येणार नाही, असा इशारा देतानाच महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही की कोणाच्याही सांगण्यावरून बंद करता येईल, हे दाखवण्यासाठी बाहेर पडा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
या संदर्भात निलेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. “आज दिवसभराच्या कामासाठी माझ्या कार्यालयात पोचलो आहे. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे दैनंदिन विषय हाताळावेत, कुठल्याही ‘महाराष्ट्र बंद’ विषयाला भीक न घालता आपापलं काम करावं. महाराष्ट्र कोणाच्या बापाचा नाही की कोणाच्याही सांगण्यावरून बंद करता येईल हे दाखवण्यासाठी बाहेर पडा” असं आवाहन त्यांनी ट्विटरवर केलं आहे.
उत्तरप्रदेशात एक घटना घडली, ती खरी की खोटी हे देखील अद्याप कुणाला माहीत नाही. त्या घटनेचा आधार घेऊन महाराष्ट्र बंद करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने आज केला आहे. एकाही शेतकऱ्याने मागणी केलेली नाही, की महाराष्ट्र बंद करा. मग कुठल्या शेतकऱ्याच्या मागे उभे आहात ? उत्तरप्रदेशात काय झाले, त्याचा निकाल कोर्टात मिळेल. फक्त त्याठिकाणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी झाडू मारून आले, त्याचे वाईट वाटतेय का राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना ? मग महाराष्ट्र बंद का केला ? काय चूक आहे महाराष्ट्रातील जनतेची ? कोरोना मध्ये हकनाक लोकं मेली, बेरोजगार झाली, त्यांना बेरोजगारी भत्ता नाही दिला, कसलं पॅकेज दिलं नाही. शेतकऱ्यांना दिला नाही. मग कसल्या शेतकऱ्यांच्या गप्पा करता ? असा सवाल करून महाराष्ट्राचा शेतकरी मरतो, त्याच्यासाठी काय केलं महाराष्ट्र सरकारने ? स्वतःच अपयश झाकण्यासाठी यूपी, बिहारचे इकडचे तिकडचे विषय बंद करा, महाराष्ट्र आज खरोखरच अडचणीत आहे, त्याला अजून अडचणीत आणू नका, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.