स्मार्ट पणदूर ग्रामपंचायत आता होणार अधिक “स्मार्ट” ; ठरणार राज्यात “आगळी वेगळी” !
सरपंच दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची घोडदौड ; गावातील घडामोडींवर राहणार “यांची” करडी नजर
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
कै.आर. आर. आबा पाटील सुंदर गाव (SMART) स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल ठरलेले कुडाळ तालुक्यातील “स्मार्ट गाव पणदूर” आता अधिकच स्मार्ट होणार आहे. पणदूर ग्रामपंचायत राबवत असलेल्या अभिनव उपक्रमांतर्गत गावातील सर्व मुख्य व अंतर्गत रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, धार्मिक आणि पर्यटन स्थळे, शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा व मोफत हाय स्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे गावातील सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसणार असून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता किंवा कचरा टाकणाऱ्यांवर ग्रामपंचायतची करडी नजर असणार आहे.
गावात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्ती, फेरीवाले, भंगार गोळा करणारे यांच्या हालचालींवर देखील यामुळे ग्रामपंचायतीचा लक्ष रहाणार आहे. गावातील महिला, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि अन्य नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मोफत हायस्पीड इंटरनेटची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही यंत्रणा 24 तास कार्यरत असणार आहे. त्यामुळे संपूर्ण गावात सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवणारी आणि मोफत हाय स्पीड इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणारी पणदूर ग्रामपंचायत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरणार आहे.
पणदूर ग्रामपंचायतीला 2019-20 मध्ये मिळालेल्या कै.आर. आर. आबा पाटील सुंदर गाव(SMART) पुरस्कारांतर्गत मिळालेल्या बक्षीस रकमेतून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे गावातील सार्वजनिक ठिकाणी सोलर हाय मास्ट देखील लावण्यात येणार आहेत. गावातील सार्वजनिक ठिकाणी आणि शासकीय कार्यालयांवर देखील सोलर वीज निर्मिती यंत्रणा बसविण्यात येणार असून गावातील सर्व नळपाणी पुरवठा योजनांचे पंप आणि रस्त्यावरील पथदिवे देखील सोलर निर्मित वीजेवर चालवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. यामधून ग्रामपंचायत पणदूर नुसता आदर्श स्मार्ट गाव नाही तर स्वच्छ आणि प्रदूषण विरहित ऊर्जेचा वापर करण्याचा संदेश देणार आहे. सरपंच दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली गावाच्या होणाऱ्या विकासाबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.