भरतगड किल्यासाठी आतापर्यंत १२ कोटी निधी खर्च ; पुढील कामांचे अंदाजपत्रक बनवण्याच्या सूचना


मालवण : राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रविवारी मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देऊन याठिकाणी पाहणी केली. हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाने आतापर्यंत १२ कोटी रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी खर्च केलेला आहे. येथील तटबंदी मजबूत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यापुढील कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण या किल्ल्याची आज पाहणी केलेली आहे. सदर कामांचे अंदाजपत्रक लवकरच बनविण्यात येईल. ही कामे सुद्धा वेळेत पूर्ण करणे हे आपले कर्तव्य आहे. या किल्ल्याला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट द्यावी, यासाठी येथील रस्ता हा जिल्हा नियोजन किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून पक्का स्वरूपाचा होण्याबाबत निर्देश देण्यात येतील. तसेच या किल्ल्या बाबतची माहिती असलेला फलक या ठिकाणी कायमस्वरूपी लावण्यात येईल, अशी ग्वाही ना. शेलार यांनी येथे दिली.

यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी किल्याचा मुख्य बुरुज, आतील टेहळणी बुरुज, खंदक, प्राचीन विहीर याबाबत माहिती घेतली. तसेच किल्यातील सिद्ध महापुरुष मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. पुरातत्व विभाग संचालक तेजस गर्गे यांना या किल्याबाबत माहिती दर्शवणारा फलक कायमस्वरूपी लावावा अशा सूचना केल्या.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सचिव अतुल काळसेकर, संचालक विलास वहाणे, मंत्री महोदयांचे ओएसडी शरद डोके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत,जिल्हा बँक संचालक बाबा परब, संदीप हडकर, संग्राम प्रभूगावकर, बंडू गावडे, रोहेश गावकर, जगदीश चव्हाण, तात्या हिंदळेकर, यासिन सय्यद, पराग खोत आदी उपस्थित होते.

Subscribe to my channel




