उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मालवणात शिवसेनेचा जल्लोष !
स्व. बाळासाहेबांचा आशीर्वाद उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी, मिंधे गटाचे प्रयत्न अयशस्वी : हरी खोबरेकर
मालवण : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने ऍड. अनिल देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिल्याचे कळताच येथील शिवसेना शाखेसमोर शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, लाडू वाटत जल्लोष साजरा केला. उद्धव ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है यासह अन्य घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.
दसरा मेळाव्या बाबत ठाकरे गट व शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावरील सुनावणी आज झाली. यात उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. याबाबतचे वृत्त समजताच येथील शिवसेना शाखेत शिवसैनिकांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, शिवसेना, शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा हे नाते अभेद्य होते. आज न्यायालयाच्या निर्णयावरून पुन्हा एकदा ते सिद्ध झाले. मिंदे गटाने ठाकरेंना दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळू नये यासाठी प्रयत्न केले. मात्र बाळासाहेबांचा आशीर्वाद हा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. शिवसैनिकांच्या रूपानेही तो त्यांच्या पाठीशी राहणार हे आज या निकालाच्या माध्यमातून स्पष्ट झाले. येणाऱ्या काळातही समोरचे मिंदे गट, गद्दार गट ज्या ज्यावेळी शिवसेनेच्या आडवा येईल त्यावेळी बाळासाहेबांच्या आशीर्वादाने निकाल हा शिवसेनेच्याच बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नंदू गवंडी, मंदार केणी, बाबी जोगी, सन्मेष परब, स्वप्नील आचरेकर, आतु फर्नांडिस, किरण वाळके, अक्षय रेवंडकर, नरेश हुले, मनोज मोंडकर, तपस्वी मयेकर, यशवंत गावकर, प्रसाद चव्हाण, मीनाक्षी शिंदे, दिगंबर बगाड, विरेश देउलकर, दत्ता पोईपकर यांच्यासह अन्य शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.