
दिव्यांग बांधवांसाठी पुढे केला मदतीचा हात; गणेश चतुर्थीनिमित्त जीवनावश्यक शिध्याचे वाटप
वेंगुर्ला : गणरायाच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र असताना वेंगुर्ल्यातून माणुसकीचा संदेश देणारी घटना समोर आली आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ रोषणाई, सजावट आणि उत्सव नव्हे, तर समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याची संधी असल्याचे दाखवून देत भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गणेश चतुर्थीनिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील दिव्यांग बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या शिध्याचे वाटप करण्यात आले. विशाल परब यांच्या हस्ते हा शिधा वितरित करण्यात आला.
एकीकडे गणेशोत्सवाचा आनंद… दुसरीकडे वाढती महागाई… आणि त्यात रोजच्या गरजा भागविण्यासाठी संघर्ष करणारे दिव्यांग बांधव. ही परिस्थिती लक्षात घेऊन सणाच्या आनंदात कुणीही मागे राहू नये, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. ‘मदत केवळ हाताने नाही, तर मनाने केली पाहिजे!’ याच भावनेतून विशाल परब यांनी दिव्यांग बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला.
गणरायाच्या आगमनाच्या आनंदात समाजातील प्रत्येक घटक सहभागी व्हावा, कुणाच्याही घरातील गणेशोत्सव आर्थिक अडचणीमुळे फिका पडू नये, हा या उपक्रमामागील संवेदनशील विचार असल्याचे यावेळी दिसून आले. या उपक्रमावेळी भाजपचे नगराध्यक्ष राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गावंढळकर, बाळू देसाई यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिधा मिळाल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंदाचे भाव या उपक्रमाचे खरे यश ठरले. गरजवंतांच्या घरापर्यंत मदत पोहोचवणे, त्यांच्या आनंदात सहभागी होणे आणि सणाचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर फुलवणे यालाच खरी सामाजिक बांधिलकी म्हणतात. गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वात विशाल परब यांच्या या उपक्रमातून ‘उत्सव आपला, आनंद सर्वांचा’ हा संदेश देण्यात आला असून, त्यांच्या या संवेदनशील उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.






Subscribe to my channel






