दोडामार्ग : दोडामार्ग ते विजघर-कोल्हापूर-बेळगाव मुख्य मार्गावरील स्नेह रेसिडेन्सीसमोर सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन परप्रांतीय तरुण कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीची समोरून येणाऱ्या मिनी टेम्पोला जोरदार धडक बसल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण कामगार दुचाकीवरून तिलारीच्या दिशेने जात होते. स्नेह रेसिडेन्सीसमोर रस्त्यावर पडलेला खड्डा चुकवण्याचा प्रयत्न करत असताना समोरून येणाऱ्या नवीन मिनी टेम्पोला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीच्या पुढील चाकाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
या अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या तरुणाचा दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. दोन्ही तरुण परप्रांतीय कामगार असून, अपघातग्रस्त दुचाकीची नोंदणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, झरे-आयनोडे येथील देसाई यांनी दिवाळी सणासाठी गुरांना चारा आणण्याच्या कामाकरिता नुकताच नवीन छोटा टेम्पो खरेदी केला होता. या अपघातात टेम्पोचेही नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, अपघात घडलेल्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा असून, तो चुकवताना यापूर्वीही अनेक अपघात घडल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. वारंवार अपघात होऊनही संबंधित खड्डा बुजवण्यात न आल्याने रस्ते देखभाल करणाऱ्या यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दिवाळीच्या सणासुदीच्या काळात दोन कष्टकरी तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर प्रशासनाला या खड्ड्याची दखल घ्यावी लागणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.





Subscribe to my channel




