पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर करणार मार्गदर्शन : पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांची माहिती

मालवण : जिल्ह्यातील पर्यटन विकास, स्थानिक अडीअडचणी, पर्यटन वाढीसाठी सूचना जाणून घेण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागामार्फत बुधवारी ३ जुन रोजी सकाळी १० वाजता तारकर्ली येथील घर मिठबावकर येथे चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रासाठी कोकण विभागाच्या पर्यटन उपसंचालक डॉ. प्रज्ञा मनोहर उपस्थित राहून पर्यटन व्यवसायिकांच्या सूचना घेणार आहेत. तरी जिल्ह्यातील पर्यटन समस्या व दिशा मांडण्यासाठी पर्यटन व्यवसायिकांनी या चर्चासत्राला उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केले आहे.
राज्य सरकार पर्यटन विभागामार्फत स्थानिक स्तरावर चर्चासत्र होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ समन्वयाची भूमिका घेत आहे. जिल्हा पर्यटन वाढीसाठी पर्यटन विभाग व स्थानिक पर्यटन व्यावसायिक यांच्या सांघिक प्रयत्नाने पर्यटन क्षेत्रात काम होणे गरजेचे आहे.सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून राज्य व केंद्र सरकारने मान्यता दिली असून राज्य सरकार तर्फे जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी विविध प्रयत्न चालू आहेत. आज सिंधुदुर्ग जिल्हा जलपर्यटन क्षेत्रात अग्रेसर होत असताना हिस्ट्री, मेडिकल, हेरिटेज, कल्चर, ऍग्रो टुरिझम, धार्मिक, साहसी, फूड, कातळ शिल्प पर्यटन क्षेत्रात बारमाही पर्यटन वाढीची क्षमता या पर्यटन जिल्ह्यात आहे. परंतु यासाठी प्रशासन स्तरावर स्थानिक पर्यटन व्यावसायिक व प्रशासन यात समन्वय होण्याची गरज आहे सरकार मार्फत अनेक पायाभूत योजनेवर करोडो रुपये खर्च होत आहेत. परंतु यातील पर्यटन पूरक प्रकल्प राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचवणे गरजेचे आहेत.
पर्यटन पूरक असलेली जिल्ह्यातील कातळशिल्प, वर्ल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला, शासकीय महापूजा मान असलेले श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा, आंगणेवाडी, कुणकेश्वर मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा असलेला राजकोट किल्ला, वैभववाडी मधील महाभारत काळातील बकासुर वाडा, नव्याने तयार झालेले नापणे येथील काचेचे पूल, सावंतवाडी येथील राजवाडा, आंबोली घाटाच्या पायथ्याशी उभे असलेले राज्यातील पहिले फिश थीम पार्क, के एस आर ग्लोबल अॅक्वेरियम,आंबोली येथील जैवविविधता गंजीफा खेळ, दशावतार सारखे अनेक संस्कृतिक तसेच मांसाहारी जेवणा सोबत शाकाहारी जेवणाची असलेली विविधता अनेक अपरिचित समुद्रकिनारे ऑनलाईन तसेच राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय स्तरावर पोचविणे, त्यांचे ब्रँडिंग करणे गरजेचे आहे. ही राज्य सरकारची जबाबदारी असून पर्यटन महामंडळाच्या वेबसाईट वर यांचा समावेश होणे गरजेचं आहे. स्थानिक व्यावसायिक यांनी स्वबळावर सरकारच्या मदतीची वाट न बघता व्यवसाय उभे केले. परंतु व्यवसायासाठी आवश्यक परवाने, अनुदान, पर्यटन पूरक पर्यटन सुविधा यावर चर्चासत्रातून मार्ग निघेल व जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी सकारात्मक चर्चा होईल अशी अपेक्षा पर्यटन व्यावसायिक महासंघास आहे. पर्यटन क्षेत्राशी निगडित संस्था, व्यक्ती यांनी यावेळी उपस्थित रहावे ज्यांना उपस्थित राहणे शक्य नाही व काही पर्यटन पूरक मुद्दे मांडायचे असल्यास पर्यटन व्यवसायिक महासंघ समन्वयक रवींद्र खानविलकर यांच्या 99698 71098 या व्हाट्सअप नंबर पाठवावेत असे आवाहन विष्णू मोंडकर यांनी केले आहे.







Subscribe to my channel






