सौरभ ताम्हणकर यांच्याकडून मांडले जातेय विकासाचे व्हिजन ; बंदिस्त गटार, चांगल्या दर्जाचे रस्ते, सौर पथदीप यांसह प्रभाग आदर्शवत बनवणार


मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; ३० वर्ष विकासापासून वंचित राहीलेल्या प्रभागाला भाजपच्या माध्यमातून गती देण्याची ताम्हणकर यांची ग्वाही
मालवण : मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ७ मध्ये भाजपचे उमेदवार युवा उद्योजक सौरभ ताम्हणकर यांच्या उमेदवारीमुळे रंगत आली आहे. मागील चार ते पाच वर्षात केलेल्या सामाजिक कार्याची शिदोरी घेऊन ताम्हणकर निवडणूक रिंगणात असल्याने भाजपने प्रस्थापितांना बाजूला ठेवत त्यांना येथून उमेदवारी दिली आहे. सौरभ ताम्हणकर यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे व्हीजन मांडले आहे. भाजपकडून युवा चेहरा असलेल्या ताम्हणकर यांना संधी दिल्याने प्रभागातील तरुण वर्गाकडून त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करण्यात आले. प्रभागातील प्रत्येक घरात आर्थिक सुबत्ता येण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही ताम्हणकर यांनी सांगितले.
प्रभागातील सर्व धार्मिक स्थळांमध्ये पर्यटक आकर्षित होण्यासाठी चांगल्या दर्जाचे रस्ते, मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई, बंदिस्त गटार व्यवस्था, सौरपथदीप याचबरोबर इतरही अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले. पर्यटनातून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास स्थानिक बाजारपेठेलाही त्याचा फायदा होणार असल्याने पुन्हा एकदा नव्याने विकासाच्या मार्गावर प्रभाग नेण्यासाठी मतदारांनी मला साथ द्यावी, असे आवाहन ताम्हणकर यांनी केले आहे.प्रभाग सातमध्ये प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघात मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल भाजप उमेदवार सौरभ ताम्हणकर बोलत होते. यावेळी त्यांनी प्रभाग सातमध्ये माझ्यासोबत सी. दीपाली दिलीप वायंगणकर आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत याही प्रचंड मतांनी विजयी होण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. प्रभागातील प्रत्येक घरामध्ये आज प्रचारादरम्यान आम्हाला आपुलकी आणि प्रेम मिळत आहे, यातून आम्हाला आमच्या विजयाची बाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे दिसत आहे, असेही ताम्हणकर म्हणाले.
मालवण शहरातील किनारपट्टी स्वच्छतेसाठी ताम्हणकर यांनी स्वतः पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांसमवेत श्रमदान करून उपक्रम राबविला होता. यासाठी आवश्यक ते सहकार्यही केले होते. मच्छीमार्केटमध्ये कचराकुंडी ठेवण्यासाठी सहकार्य केले. किनारपट्टी स्वच्छ असेल, तर पर्यटक आणि स्थानिकांना त्याचा फायदा होईल, असे ताम्हणकर यांनी सांगितले. महिलांना सांस्कृतिक उपक्रमात सहभागी करून घेताना विविध कार्यक्रम आयोजित केले. तसेच ई श्रम कार्ड, आयुष्यमान कार्ड यासाठी खास शिबिरे त्यांनी आपल्या विभागात घेतली. तसेच लोकांना कार्डही घरपोच करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रभाग सातमवील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी ठिकठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून त्यांच्यासाठी गरजेनुसार मोठ्या शहरातील रुग्णालयात उपचार करण्यासाठी पुढाकार घेण्याचीही इच्छा ताम्हणकर यांनी बोलून दाखविली आहे.
प्रभाग सात हा भाजपचा बालेकिल्ला असून या प्रभागातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रचारात मिळत आहे. मतदारांकडून गेली तीस वर्षे प्रभागात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात येत आहे. याठिकाणी पर्यटनदृष्ट्या वेगळे उपक्रम आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी प्रभागातील प्रत्येक घरात हक्काचा आपला नगरसेवक म्हणून प्रतिमा निर्माण करण्यासाठी काम करणार आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक विजयी होणे आवश्यक आहे. यामुळे मतदारांची भक्कम साथ मला मिळत असल्याचेही ताम्हणकर म्हणाले भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांच्यामुळेही आमच्या प्रभागात मतदारांकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रभागातून भाजपला एक हजाराचे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास ताम्हणकर यांनी व्यक्त केला

Subscribe to my channel




