घोषणांचा फुगा फुटला; सिंधुदुर्गच्या प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांचा ‘फ्लॉप शो’ – मनसे नेते शिरीष सावंत यांचा हल्लाबोल

मालवणात मनसेच्या कार्यालयाचे उदघाटन : चिपी विमानसेवा, विजयदुर्ग बोटसेवा, महामार्ग, टोलनाका अन् रोजगारावरून सत्ताधारी लक्ष्य

मालवण : “जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्थानिक आमदार अभ्यास न करता केवळ हवेत विरणाऱ्या घोषणा करत आहेत. घोषणा मोठ्या, मात्र प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही. चिपी विमानसेवेपासून विजयदुर्ग बोटसेवेपर्यंत आणि मुंबई-गोवा महामार्गापासून रोजगाराच्या प्रश्नापर्यंत सत्ताधाऱ्यांचा कारभार पूर्णपणे अपयशी ठरला आहे,” असा जोरदार हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख शिरीष सावंत यांनी केला.

कचेरी रोड येथील मनसेच्या नवीन तालुका कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सावंत यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. “जनतेला घोषणांचे गाजर नको, प्रत्यक्ष विकास हवा,” असा थेट इशाराही त्यांनी दिला. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, शहराध्यक्ष सागर जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन बोडवे, विल्सन गिरकर, जेनिफर अन्ननसिएशन, सुरज पुजारे, संतोष सावंत, प्रसाद परब, प्रितेश सावंत, नारायण शिरोडकर, प्रसाद मेस्त्री, महेश गावडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१५ ऑगस्टपासून नवी मुंबई-चिपी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. मात्र, १५ ऑगस्ट उजाडूनही ही घोषणा प्रत्यक्षात आली नसल्याने “नेहमीप्रमाणे घोषणेचा फुगा फुटला,” असा टोला सावंत यांनी लगावला. मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली भाऊचा धक्का-विजयदुर्ग बोटसेवाही काही महिन्यांतच बंद पडली. त्यामुळे पर्यटन आणि प्रवाशांच्या सुविधांबाबतच्या सत्ताधाऱ्यांच्या घोषणांची वास्तविकता समोर आली असल्याचे त्यांनी म्हटले.

महामार्ग रखडला; चाकरमान्यांच्या हालाला कोण जबाबदार?

मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप १५ ते २० टक्के अपूर्ण असल्याचा दावा करत सावंत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. “वर्षानुवर्षे महामार्गाचे काम रखडले आहे. त्याचा फटका यंदाच्या गणेशोत्सवातही कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जिल्हावासीयांच्या खिशातून वसुली करण्याचा हा कोणता विकास?”

ओसरगाव येथे सुरू होणाऱ्या टोलनाक्यावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला. शासकीय कामांसाठी तसेच दैनंदिन गरजांसाठी ओरोसला ये-जा करणाऱ्या जिल्हावासीयांच्या खिशावर या टोलनाक्यामुळे अतिरिक्त भार पडणार आहे. “टोलनाका लावायचाच असेल तर तो खारेपाटण हद्दीत असायला हवा; जिल्हावासीयांच्या खिशातून वसुली करण्याचा हा कोणता विकास?” असा सवाल सावंत यांनी केला.

एलईडी मासेमारीपासून रोजगारापर्यंत प्रश्नच प्रश्न!

जिल्ह्यातील एलईडी मासेमारीचा प्रश्न अद्याप कायम आहे. गवारेडे, परिसरातील हत्तींचा उपद्रव, रेल्वेच्या अपुऱ्या फेऱ्या आणि वाढत्या बेरोजगारीकडेही लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विशेषतः ‘जेन झी’ युवा पिढीच्या हाताला रोजगार देण्यासाठी ठोस धोरण कुठे आहे? असा सवाल करत सावंत यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. “जिल्ह्यातील तरुणांना रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे जावे लागत असेल, तर मग विकासाच्या मोठमोठ्या घोषणा नेमक्या कोणासाठी?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रश्न सुटत नाहीत, मग घोषणांचा उपयोग काय?

चिपी विमानसेवा, बोटसेवा, महामार्ग, टोलनाका, रेल्वे, एलईडी मासेमारी, हत्तींचा उपद्रव आणि रोजगार असे अनेक मूलभूत प्रश्न जिल्ह्यासमोर आहेत. मात्र, या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याऐवजी केवळ घोषणा आणि प्रसिद्धीचा खेळ सुरू आहे,” अशी टीका सावंत यांनी केली.

“मनसे आता गप्प बसणार नाही. जिल्ह्यातील प्रत्येक प्रलंबित प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना जाब विचारला जाईल. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

error: Content is protected !!