राणे समर्थक, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर शिवबंधनात !

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत केला शिवसेनेत प्रवेश

“या” कारणासाठी शिवसेनेत प्रवेश : महेश जावकरांनी व्यक्त केली भावना : पालिका निवडणूकी बाबतही केले भाष्य

कुणाल मांजरेकर

मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे मालवण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर यांनी शिवबंधन हाती बांधले आहे. युवासेनाप्रमुख तथा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी बुधवारी हा पक्षप्रवेश संपन्न झाला. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मालवण शहराच्या विकासासाठी आपण शिवसेनेत दाखल झालो आहे. आपला कोणावरही राग, रोष, रुसवा नाही, असे सांगतानाच येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार संघटनात्मक कामात झोकून देणार असल्याची प्रतिक्रिया महेश जावकर यांनी “कोकण मिरर” शी बोलताना व्यक्त केली.

दरम्यान, देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास वालावलकर यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. ना. आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन दोघांचेही पक्षात स्वागत केले.

देऊळवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुहास वालावलकर यांचे शिवसेनेत स्वागत करताना पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे सोबत अन्य

यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, मालवण शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, हेमंत डिचोलकर, भूषण परुळेकर, रीमेश चव्हाण, सौ. जावकर आदी उपस्थित होते.

शहराच्या विकासासाठीच शिवसेनेत प्रवेश : महेश जावकर

युवासेनाप्रमुख ना. आदित्य ठाकरे यांच्याशी अत्यंत चांगल्या वातावरणात आपली चर्चा झाली आहे. आम्ही कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता शिवसेनेत प्रवेश केला आहे. यापुढील काळात प्रामाणिकपणे शिवसेनेचे संघटनात्मक काम करणार असल्याची प्रतिक्रिया महेश जावकर यांनी व्यक्त केली आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या आदेशानुसार कामात झोकून देऊन जनतेची प्रलंबित विकास कामे आमदार वैभव नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत. यासाठीच काही काळाच्या विश्रांतीनंतर सक्रिय राजकारणात पुन्हा एकदा आपण सहभाग घेतल्याचे महेश जावकर यांनी म्हटले आहे. आपला शिवसेनेतील प्रवेश कोणावरही राग, रोष अथवा रुसव्याने झाला नसून शहराच्या विकासासाठी आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे महेश जावकर यांनी “कोकण मिरर”शी बोलताना सांगितले.

महेश जावकर हे मालवण नगरपालिकेतील अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. नगरसेवक पदाच्या कालावधीत शहराच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पालिकेचे उपनगराध्यक्ष व बांधकाम सभापती म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. २०१२ च्या नगरपालिका निवडणुकीत त्यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्षरित्या नगरसेवक पदाची निवडणूक लढविली. या निवडणुकीत ते निवडूनही आले होते. काही कालावधी नंतर ते राणेंच्या जवळ गेले. अलीकडे काही दिवस पक्ष संघटनेपासून काहीसे अलिप्त असलेल्या महेश जावकर यांनी मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मेढा भागात शिवसेनेला अभ्यासू चेहरा मिळाला आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!