फवारणी करून खाली उतरताना घडली दुर्घटना


मालवण : आचरा भंडारवाडी येथे करारावर घेतलेल्या आंबा कलमावर फवारणी करून खाली उतरताना सुमारे ३० फुटांवरून दगड-धोंड्यांमध्ये कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज (वय-४५, रा. भरड, मालवण) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबतची खबर भाऊ, लुईस फ्रान्सिस कार्डोज (वय-४२) यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.
लुईस फ्रान्सिस कार्डोज हे गेली १० वर्षांपासून आंबा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी आचरा भंडारवाडी येथील आंबा कलम कराराने घेतले होते. आज ते त्यांची पत्नी, भाऊ अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज आणि कामगार यांच्यासह आंबा झाडांवर फवारणी करण्यासाठी आले होते. फवारणी करण्यासाठी अँड्र्यू कार्डोज हे उंच असलेल्या आंबा कलमावर चढले होते. कलमावरील फवारणी पूर्ण झाल्यानंतर ते डेरेदार कलमावरून दोरीच्या सहाय्याने खाली उतरत होते. याच दरम्यान त्यांच्या हातातील दोरी सुटल्याने अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज हे सुमारे तीस फुटांवरून झाडाखाली असलेल्या दगड-धोंड्यांमध्ये कोसळले.
राजन वराडकर, गणेश लुडबे यांचे सहकार्य
आचरा येथील दुर्घटनेत भरड भाट येथील अँड्र्यू फ्रान्सिस कार्डोज यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच माजी उप नगराध्यक्ष राजन वराडकर व गणेश लुडबे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहावर पुढील सोपस्कार पूर्ण होण्यासाठी सहकार्य केले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर आणि मनोज पुजारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर घाडीगावकर करत आहेत.

Subscribe to my channel




