महायुतीच्या नगरसेवकांकडून एकमताने निवड ; उबाठाच्या नगरसेवकांनीही केले अभिनंदन


स्वीकृत नगरसेवक म्हणून महेश कांदळगावकर व रविकिरण तोरसकर यांची निवड
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेत सलग दोनवेळा मोठ्या मताधिक्याने निवडून जात “कार्यसम्राट” नगरसेवक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या कर्तृत्वावर आज उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वपक्षीयांनी मोहोर उमटवली आहे. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी दीपक पाटकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज झालेल्या नगरपालिकेच्या पहिल्या सभेत सर्व सदस्यांनी दीपक पाटकर यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड केली.

श्री. पाटकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजपचे नगरसेवक देखील महायुती म्हणून एकत्र होते. तर या पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी पालिकेच्या बैठकीत श्री. पाटकर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेच्या श्री दत्त रामेश्वर रामेश्वर शहर विकास आघाडी कडून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तर भाजपच्या मालवण शहर विकास समिती कडून मच्छिमार नेते रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांची निवड करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्वांचे अभिनंदन केले.

दुपारी ११.२१ वाजण्याच्या सुमारास दीपक पाटकर यांनी मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून शिवसेनेच्या गटनेत्या पूनम चव्हाण तर अनुमोदक म्हणून शिवसेना नगरसेवक सहदेव बापार्डेकर यांनी सह्या केल्या आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुणाचाही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली.

स्वीकृत नगरसेवकांसाठी शिवसेना आणि भाजप कडून अनेक इच्छूक होते. मात्र शिवसेना नेतृत्वाने माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचा नगरपालिकेतील प्रशासकीय व नगराध्यक्ष कामाचा अनुभव व अभ्यासूपणा लक्षात घेऊन त्यांचे स्वीकृत सदस्यासाठी नाव निश्चित केले. तर भाजपने मच्छिमार नेते रविकिरण उर्फ विकी तोरसकर यांचे मच्छिमार लढ्यातील योगदान विचारात घेऊन त्यांचे नाव स्वीकृत सदस्यासाठी निश्चित केले. या दोन्ही स्वीकृत सदस्यांची निवड या सभेत करण्यात आली.

“कोकण मिरर” चे भाकीत खरे ठरले…
मालवण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजताच पालिकेत एकदा स्वीकृत तर दोनवेळा जनतेतून नगरसेवक म्हणून निवडून आलेले कार्यसम्राट नगरसेवक दीपक पाटकर यांच्याकडे संभाव्य नगराध्यक्ष म्हणून पाहिले जात होते. मात्र मालवणात महिला आरक्षण पडल्याने श्री. पाटकर यांची संधी हुकली. परंतु, २१ डिसेंबर रोजी पालिकेवर नगराध्यक्ष पदासह शिवसेनेची निर्विवाद सत्ता आल्यानंतर दीपक पाटकर यांचीच उप नगराध्यक्ष पदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात होती. याबाबत २४ डिसेंबरला “कोकण मिरर” ने सर्वात प्रथम याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. आज उपनगराध्यक्ष निवडणुकी साठी शिवसेनेने दीपक पाटकर यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केल्याने ” कोकण मिरर” चे भाकीत खरे ठरले आहे.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्ष ममता वराडकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेच्या गटनेत्या पूनम चव्हाण, नगरसेवक सहदेव बापार्डेकर, महेश कोयंडे, सिद्धार्थ जाधव, नीना मुंबरकर, शर्वरी पाटकर, मेघा गावकर, भाग्यश्री मयेकर, अश्विनी कांदळकर, भाजपच्या गटनेत्या अन्वेशा आचरेकर, नगरसेवक मंदार केणी, ललित चव्हाण, दर्शना कासवकर, महानंदा खानोलकर, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते महेंद्र म्हाडगूत, नगरसेवक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अनिता गिरकर, माजी नगराध्यक्ष व अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांच्यासह मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, भाई मांजरेकर, मोहन वराडकर, जगदीश गावकर, जॉन नरोन्हा, अर्चना मिठबावकर, स्वप्नाली नेरूरकर, ज्योती तोरसकर तसेच अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Subscribe to my channel




