
ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न
सिंधुदुर्गनगरी : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी जोडलेले सण यंदा जवळच्या कालावधीत येत आहेत. त्यामुळे सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा, भावना आणि परंपरांचा आदर राखत हे सण उत्साहात, मात्र शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवून साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी केले.
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरंगी हॉल येथे जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, मिरवणुकांचे नियोजन, वाहतूक व्यवस्था, ध्वनिप्रदूषण, सोशल मीडियावरील अफवा तसेच विविध समाजघटकांमधील समन्वय या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह पोलीस, वाहतूक, राज्य परिवहन विभागाचे अधिकारी तसेच शांतता समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
डॉ. दहिकर म्हणाले की, सण साजरे करताना प्रत्येक समाजाने इतरांच्या श्रद्धांचा सन्मान करणे आवश्यक आहे. सणांच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध समाजातील प्रमुखांनी एकमेकांशी सातत्याने संवाद आणि समन्वय ठेवावा. प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखण्यात नागरिकांनीही सक्रिय भूमिका बजावावी. मिरवणुकांचे मार्ग आणि वेळा आधीच निश्चित करून प्रशासनाची आवश्यक परवानगी घ्यावी. मिरवणुकांमध्ये डीजे, ध्वनिक्षेपक आदींचा वापर करताना निर्धारित वेळ व ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी प्रक्षोभक भाषणे, आक्षेपार्ह बॅनर अथवा पोस्टर लावणे टाळावे. तसेच कोणत्याही समाजाच्या भावना दुखावतील असा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अफवांना थारा नको
सणांच्या काळात सोशल मीडियावर अफवा किंवा चुकीची माहिती वेगाने प्रसारित होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतीही माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून पाहावी. अफवा किंवा आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तो प्रसारित न करता तत्काळ पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावा. संशयास्पद हालचाल, वादाची शक्यता किंवा अनुचित घटना आढळल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. दहिकर यांनी केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी गणेश मंडळे, शांतता समितीचे सदस्य आणि स्थानिक नागरिकांनी पोलिस व प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे आवाहन केले. मिरवणुकांचे मार्ग, वेळा आणि नियोजनाची माहिती प्रशासनाला वेळेत देऊन सण-उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.
‘एकमेकांच्या श्रद्धांचा सन्मान हाच शांततेचा आधार’
सर्व धर्मांच्या श्रद्धा, परंपरा आणि सणांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. कोणत्याही धर्माबाबत अवमानकारक टिप्पणी करणे टाळावे, संवादातून गैरसमज दूर करावेत आणि अफवांमुळे सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सूर बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी शांतता समितीच्या अशासकीय सदस्यांनीही विविध विषय मांडले. जिल्ह्यातील सीसीटीव्ही व्यवस्था, रस्ते दुरुस्ती, वाहतूक कोंडी तसेच सणांच्या काळातील आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.






Subscribe to my channel






