‘शिवराजेश्वर’ मंदिराला वार्षिक १ लाख, तर औरंगजेबाच्या कबरीला अडीच लाख का?

औरंगजेबाच्या कबरीचा निधी बंद करा ; ‘शिवराजेश्वर’ मंदिराला वार्षिक १२ लाखांची मदत द्या! हिंदु जनजागृती समितीची मागणी

कुडाळ : सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक निधी हा अत्यंत तुटपुंजा असून, तो क्रूर आक्रमक औरंगजेबाच्या कबरीला मिळणाऱ्या निधीपेक्षाही निम्म्याने कमी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या मंदिराला वर्षाला १ लाख आणि क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी तब्बल अडीच लाख रुपये दिले जाणे, हा छत्रपती शिवरायांचा अवमान आहे. सरकारने औरंगजेबाच्या कबरीचा निधी तातडीने बंद करावा आणि श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी विशेष बाब म्हणून वार्षिक १२ लाख रुपयांचा निधी मंजूर करावा,’ अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक तथा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य संघटक संजय जोशी यांनी कुडाळ येथील हॉटेल स्पाइस कोकण येथील पत्रकार परिषदेत केली.

या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजेंद्र पाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊळ, शिवप्रेमी संघटनेचे रमाकांत नाईक उपस्थित होते. श्री. संजय जोशी पुढे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि शिवप्रेमी या मंदिराचा निधी वाढवण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहेत. महायुती सरकारने नुकताच २० मे २०२६ रोजी शासन निर्णय काढून श्री शिवराजेश्वर मंदिराचे वार्षिक अनुदान १ लाख रुपये केले. वरवर पाहता ही वाढ चांगली वाटत असली, तरी वास्तवात ही रक्कम अत्यंत अपुरी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महसूल विभागाच्या प्रधान सचिवांना दर महिन्याला ५० हजार रुपयांचा निधी देण्याचे निर्देश दिले होते; मग हा निधी कमी कसा काय झाला? प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी छत्रपती शिवरायांचे मूल्य औरंगजेबापेक्षा कमी आहे का ? माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून औरंगजेबाच्या कबरीच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्ष २०२२ आणि २०२३ मध्ये तब्बल २,५५,१६० व २,००,६२६ रुपये निधी दिला गेला आहे. म्हणजेच, हा निधी छत्रपतींच्या मंदिराला घोषित निधीपेक्षा दुप्पट आहे.

वार्षिक १ लाख रुपये का अपुरे आहेत?

शासनाने मंजूर केलेल्या वार्षिक १ लाख रुपये निधीचा हिशोब केल्यास, महिन्याला जेमतेम ८,३३३ रुपये, अर्थात २७४ रुपये प्रतीदिनी वाट्याला येतात. एका दिवसाच्या खर्चाचा विचार केला, तरी महाराजांच्या मूर्तीवरील नित्यपूजेसाठी फुले, मोठा हार, रोजची दिवाबत्ती, धूप, नारळ, पूजाआरती, भाविकांना प्रसाद, मूर्तीला वस्त्रांलंकार, मंदिराची स्वच्छता, परिसर स्वच्छता, रोज मंदिरात बोटीने ये-जा करण्यासाठीचा प्रवास खर्च; मासिक खर्चामध्ये पुजाऱ्याचे वेतन, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन; नैमित्तिक खर्चामध्ये मंदिराची रंगरंगोटी-डागडुजी आणि शिवजयंतीसारखे वार्षिक व अन्य उत्सव यांचा विचार करता महिन्याला ८,३३३ रुपये अत्यंत तुटपुंजा आहे.

प्रशासन व सरकारला सवाल आणि प्रमुख मागण्या

महिन्याला २५० रुपयांवरून ८,३३३ रुपये वाढवण्यासाठी सरकारला तब्बल ५५ वर्षे लागली. यापूर्वीची नावाला छत्रपती शिवराय म्हणत निधर्मीवादाची ढोलकी वाजवणारी अनेक सरकारे येऊन गेली; मात्र कोणी काहीच केले नाही. आताचे हिंदुत्ववादी सरकार, छत्रपती शिवरायांच्या विचारांचे सरकार आहे, त्यामुळे या निधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला, हा स्तुत्य निर्णय आहे; मात्र हा वाढीव निधीही तुटपुंजा आहे, हे आम्हाला सरकारच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे. महाराजांच्या मंदिराकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.

छत्रपती राजाराम महाराजांनी वर्ष १६९५ मध्ये बांधलेले जगातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे शिवछत्रपतींची ‘मूर्ती’ पूजली जाते आणि जिथे महाराजांच्या हाताचे आणि पायांचे ठसे जतन केलेले आहेत. अशा सर्वोच्च ऐतिहासिक वारशाची प्रशासकीय हेळसांड अक्षम्य आहे. मंदिरासाठी विशेष बाब म्हणून जोपर्यंत महिन्याला किमान १ लाख रुपयांचा (वार्षिक १२ लाख) निधी मंजूर केला जात नाही, तसेच मंदिर परिसराचे सुशोभिकरण केले जात नाही, तोपर्यंत आमचा हा लढा आणि पाठपुरावा असाच चालू राहील. सरकारने तातडीने यावर योग्य तो निर्णय घेऊन महाराष्ट्राच्या अस्मितेला न्याय द्यावा, असेही समितीने म्हटले आहे.

error: Content is protected !!