राणेंची यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण ; विनायक राऊतांची टीका
रत्नागिरी : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे हे सध्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंच्या या यात्रेवर टीका केली आहे. राणेंची ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे. या यात्रेमुळे राणे तिसरी लाट कोकणात घेऊन येत आहेत. कोकणवासीयांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असल्याची टीका खा. राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळल्याचे वक्तव्य ना. राणेंनी केले होते. या अनुषंगाने बोलताना राणेंना ठोकम ठोकी करण्याची सवयच आहे. स्वत:च्या अनुभवावरून इतरांना मोजण्याचा त्यांचा गुणधर्मच आहे, असं वक्तव्य विनायक राऊतांनी केलं आहे.
विनायक राऊत यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंवर पुन्हा एकदा टीका केली. स्वार्थासाठी शिवसेनेशी बेईमानी केलेल्या राणेंना इतर सुद्धा तसेच दिसतात. याच भावनेमुळे एकनाथ शिंदेवर राणेंनी आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे हाडाचे शिवसैनिक आहेत. शिंदे मंत्रीपदाला न्याय देत आहेत. पक्ष संघटना सुद्धा मजबुत करण्याचे काम करत आहेत, असं सांगतानाच स्वतःच्या अनुभवावरून इतरांना मोजणे हा नारायण राणेंचा गुणधर्म असल्याची खोचक टीका राऊत यांनी केली.राणेंना ठोकम ठोकी करायची सवयच आहे. शिंदे शिवसेनेसाठी अभिमान असणारे मंत्री आहेत, असं गौरवोद्गारही त्यांनी काढलं. जिल्हा नियोजनाची बैठक दहा दिवस अगोदर जाहीर केली आहे. नारायण राणेंना काटशह देण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. तसेच कोकणात येणाऱ्या जन आशीर्वाद यात्रेला शिवसेना गांभिर्याने घेत नाही, असंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्यास सांगितलं. परंतु, पंतप्रधानांच्या या आवाहनाला राणेंनी हरताळ फासला. जन आशीर्वाद यात्रेतून राणेंनी लोकांचे किती प्रश्न समजवून घेतले?, असा सवालही त्यांनी केला आहे.