सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क : कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

सिंधुदुर्गनगरी (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ८ पेट्रोलपंपांवर इंधन उपलब्धतेसंदर्भात अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी हे जिल्ह्यातील उर्वरित ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू असल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाने कळविले आहे.

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ६ पेट्रोलपंपांवर पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांचा तात्पुरता तुटवडा आहे. तसेच २ पेट्रोलपंपांपैकी एका पंपावर केवळ पेट्रोल उपलब्ध असून डिझेल उपलब्ध नाही, तर दुसऱ्या पंपावर डिझेल उपलब्ध असून पेट्रोल उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.वरिल ड्राय असलेले पेट्रोल पंप चे टॅंकर लोड करण्यात येऊन उद्या पर्यंत पुर्ववत स्थिती होईल असे कंपन्यांचे विक्रय प्रतिनिधी व डेपो व्यवस्थापकांनी कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधन विषयक भिती बाळगण्याचे कारण नाही.

उर्वरित बहुतांश पेट्रोलपंप सुरळीत सुरू असून संबंधित कंपन्यांच्या पुरवठ्यानुसार आणि डेपोमधील मागणीनुसार इंधन वितरण सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), इंडियन ऑईल (IOCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) या कंपन्यांच्या डिपो व्यवस्थापक व विक्री प्रतिनिधींशी सातत्याने संपर्क ठेवला आहे.

याशिवाय, कृत्रिम दरवाढ किंवा इंधन साठेबाजीचे प्रकार रोखण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथके सक्रिय करण्यात आली आहेत. पेट्रोलपंपांची तपासणी आणि छापे टाकण्याचे आदेश देण्यात आले असून, कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

error: Content is protected !!