चिपळूणमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; महिला कर्तृत्ववानांचा विशेष सन्मान

क्रीडा भारतीतर्फे क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण व महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

चिपळूण : क्रीडा भारती कोकण प्रांत, जिल्हा रत्नागिरी व चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा ज्ञान परीक्षा बक्षीस वितरण समारंभ आणि महिला सन्मान पुरस्कार सोहळा नुकताच चिपळूण येथील माधवबाग येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


या कार्यक्रमाला श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलाचे संचालक श्रीकांत पराडकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर धनश्री गोखले यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
क्रीडा ज्ञान परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या आर्या जोगळे, रोहित गुप्ता आणि अदिती शेंडगे यांना गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक प्राप्त तेजस्विनी गोखले, तर तृतीय क्रमांक मिळविणारे रितेश जड्याळ, प्रतीक्षा पानवलकर आणि रिया पाष्टे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना धनश्री गोखले यांनी खेळाडूंनी केवळ नियमित सरावावर भर न देता आपल्या खेळाविषयी सखोल ज्ञान आत्मसात करणेही आवश्यक असल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर आपल्या आवडत्या खेळात तसेच क्रीडा क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींची माहिती खेळाडूंनी सातत्याने घेतली पाहिजे. उत्तम कामगिरीसाठी शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची असून त्यासाठी विशेष मेहनत घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख अतिथी श्रीकांत पराडकर यांनी आधुनिक क्रीडा प्रशिक्षणातील स्पोर्ट्स सायन्सचे महत्त्व विशद केले. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडा संकुलामध्ये खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी स्पोर्ट्स सायन्सच्या विविध पैलूंवर काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. खेळाडूंच्या कामगिरीनुसार आहारविषयक मार्गदर्शन, दुखापती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय, मानसिक कणखरता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.


खेळाडूंनी शारीरिक क्षमतेसोबतच योग्य आहार, दुखापत प्रतिबंध, मानसिक तयारी आणि शास्त्रीय प्रशिक्षण यांची सांगड घालणे आवश्यक आहे. या आधुनिक प्रशिक्षण पद्धतींचा लाभ घेण्यासाठी खेळाडूंनी एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स सायन्स सेंटरला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहनही श्री. पराडकर यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा प्रशिक्षक प्रमुख सोनाली वऱ्हाडे, सिद्धेश लाड, प्रमुख वक्त्या धनश्री गोखले यांच्यासह क्रीडाप्रेमी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; दुर्गामाता दौडमधील वीरांगनांचाही गौरव!

महिला सक्षमीकरण आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात निशा आंबेकर, रमा करमरकर आणि तन्वी रेडीज यांना विशेष महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच दुर्गामाता दौडमध्ये सशस्त्र स्वरूपात सहभागी झालेल्या अनन्या टोणे आणि मीरा तांबे यांचाही विशेष सन्मान करून त्यांच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!