
संवादातून सुटले प्रश्न; उपोषणकर्त्यांची संख्या घटली
स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणेंनी साधला होता उपोषणकर्त्यांशी संवाद
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात विविध प्रश्नांसाठी दरवर्षी उपोषणाचा मार्ग स्वीकारणाऱ्या नागरिकांची संख्या यंदा लक्षणीयरीत्या घटली असून, स्वातंत्र्यदिनी केवळ २० नागरिक उपोषणाला बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही वर्षांत ही संख्या साधारणतः १०० ते १५०च्या आसपास असताना यंदा ती थेट २० वर आल्याने पालकमंत्री नितेश राणे यांच्या ‘संघर्षापेक्षा संवाद’ या भूमिकेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
नागरिकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषणाची नोटीस दिल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती तपासून नियमांच्या चौकटीत सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या संवादामुळे अनेक उपोषणकर्त्यांचे समाधान झाले आणि त्यांनी उपोषणाऐवजी चर्चेतून प्रश्न सोडविण्याला पसंती दिली.
प्रश्न ऐकून घेणे, त्यामागील वस्तुस्थिती समजून घेणे आणि संबंधित यंत्रणेकडून कार्यवाही करून घेणे, या प्रक्रियेला पालकमंत्री राणे यांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याऐवजी प्रशासनाशी थेट संवाद साधून मार्ग काढण्याची मानसिकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांच्या प्रश्नांवर पालकमंत्री राणे यांच्या पुढाकाराने प्रशासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सहकार, महसूल, जिल्हा परिषद, कृषी, पोलीस, नगरपालिका, पाणीपुरवठा, वीज वितरण तसेच बीएसएनएल टॉवर यांसारख्या विविध विषयांवरील प्रकरणांची संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली असून, नियमांच्या चौकटीत सकारात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यापूर्वी ११० नागरिकांनी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या. त्यापैकी अनेक प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाल्याने संबंधित नागरिकांनी उपोषणाचा मार्ग टाळला. उर्वरित २० प्रकरणांवरही प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत असतानाच, दुसरीकडे नागरिकांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा काढण्याची वाढती भूमिका ही सिंधुदुर्गच्या बदलत्या सकारात्मक मानसिकतेचे दर्शन घडविणारी ठरली आहे. पालकमंत्र्यांच्या थेट संवादामुळे उपोषणाऐवजी चर्चेला मिळालेली पसंती हा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’ आगामी काळात नागरिक-प्रशासन संबंधांसाठी नवा आदर्श ठरतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.






Subscribe to my channel






