पाण्याची टाकी साफ करताना मधमाशांचा हल्ला ; ३८ वर्षीय महेश साळकर यांचा मृत्यू

उपचारानंतर घरी परतले; मध्यरात्री प्रकृती बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी केले मृत घोषित

मालवण : कांदळगाव-साळकरवाडी येथे पाण्याची टाकी साफ करत असताना मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश बळीराम साळकर (वय ३८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी (१७ सप्टेंबर) घडलेल्या या घटनेने साळकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

महेश साळकर हे वाचनालय कर्मचारी म्हणून कार्यरत होते. १७ सप्टेंबर रोजी आपल्या घराकडील पाण्याची टाकी साफ करण्याचे काम सुरू असताना त्यांचे चुलत भाऊ जयवंत साळकर तसेच शेजारी संजय साळकर आणि संतोष साळकर हेही त्यांना मदत करत होते. चौघेही टाकी साफ करत असतानाच जमिनीतील मधमाशांच्या पोळ्यात पाणी गेल्याने अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला.

या हल्ल्यावेळी महेश साळकर हे टाकीमध्ये उतरून साफसफाई करत असल्याने त्यांना बाहेर पडण्यास काहीसा विलंब झाला. त्यामुळे मधमाशांनी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि ते गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर सुशांत सुर्वे यांनी त्यांना मालवण येथील शासकीय रुग्णालयात सायंकाळी साडेचार-पाचच्या सुमारास दाखल केले. चौघांवरही उपचार करण्यात आले व इंजेक्शन देण्यात आले. महेश यांना मधमाशांचा अधिक प्रमाणात दंश झाल्याने त्यांना काही काळ रुग्णालयात ठेवून उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रात्री सुमारे आठ वाजता त्यांना घरी सोडण्यात आले.

मात्र, मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शौचालयातून आल्यानंतर महेश यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यानंतर सुशांत सुर्वे यांनी त्यांना पुन्हा तातडीने मालवण शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महेश साळकर यांच्या पश्चात वयोवृद्ध वडील, भाऊ, आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

error: Content is protected !!