१०० व्या साहित्य संमेलनाची नांदी अक्कलकोटमध्ये; स्वागताध्यक्षपदी नगरसेवक महेश इंगळे

अक्कलकोट : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १०० व्या साहित्य संमेलनाची उत्सुकता राज्यभरात निर्माण झाली असतानाच अक्कलकोटमध्ये या ऐतिहासिक साहित्य सोहळ्याची नांदी होणार आहे. पुणे येथे २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या १००व्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात आयोजित करण्यात येणाऱ्या ९९ नांदी साहित्य संमेलनांपैकी ‘ग्रंथपाल नांदी साहित्य संमेलन’ अक्कलकोटमध्ये २५ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. या महत्त्वपूर्ण संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विद्यमान नगरसेवक तथा श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्कलकोट शाखेच्या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आल्याची माहिती शाखाध्यक्षा शैलशिल्पा जाधव यांनी दिली. त्यामुळे अक्कलकोटच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात या निवडीचे विशेष महत्त्व अधोरेखित झाले आहे.

महेश इंगळे यांनी नगरसेवक तसेच नगराध्यक्ष म्हणून काम करताना शहराच्या विविध विकासकामांसोबत सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातूनही त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या नांदी साहित्य संमेलनाकडे साहित्यप्रेमींचे लक्ष लागले आहे.

१००व्या साहित्य संमेलनाच्या ऐतिहासिक पर्वाची अक्कलकोटमधून होणारी ही साहित्यिक नांदी शहराच्या सांस्कृतिक वैभवात आणखी एक मानाचा तुरा रोवणारी ठरणार आहे. साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हे संमेलन उत्साहात पार पडणार असल्याने अक्कलकोटच्या साहित्यिक वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

महेश इंगळे यांच्या निवडीबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, अप्पू मालक पराणे, ओंकारेश्वर उटगे, विद्याधर गुरव, विश्वनाथ देवरमनी, मनोज जगताप, कुमार हतुरे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, श्रीमंत खसगी, सचिन किरनळ्ळी, सिद्धराम बिडवे, माशाळे साहेब, सुरेश शटगार, संतोष जवळगे सर, दत्ता कटारे, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, अंकुश केत, रमेश शिंदे आदींसह देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, चंद्रकांत गवंडी तसेच नागरिकांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!