कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार : नव्या शेडलाही मंजुरी

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश

प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू

कणकवली : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली रेल्वे स्थानकातील दोन महत्त्वाच्या प्रवासी सुविधा मार्गी लागल्या आहेत. कणकवली स्थानकातील सरकता जिना आता प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर १६० मीटर लांबीच्या नव्या शेडच्या उभारणीला देखील मंजुरी मिळाली आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे महत्त्वाचे स्थानक मानले जाते. या स्थानकावरील विविध सुविधांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही करण्यात आली.गेल्या महिन्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. अवघ्या काही दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आले असून आता हा जिना प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाला आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ६८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून ताशी सुमारे सहा हजार प्रवाशांची वाहतूक क्षमता या जिन्याची आहे. याशिवाय प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० मीटर लांबीच्या नव्या शेडची उभारणी करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून लवकरच कामाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. हे कामही तातडीने पूर्ण करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे कणकवली स्थानकातील दोन महत्त्वाच्या सुविधा मार्गी लागल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!