कोंकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांच्या वतीने आयोजन


मालवण : खळखळणारा समुद्र, लांबच लांब वाळूचा किनारा आणि हातात रॉड-रील घेऊन उभे असलेले देशभरातील अँगलर्स… हे दृश्य पाहायला मिळणार आहे २० व २१ डिसेंबर रोजी तोंडवळी तळाशिल समुद्र किनाऱ्यावर… कोंकण एक्स्ट्रीम अँगलर्स यांच्या वतीने आयोजित सर्फ फिशिंग स्पर्धा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या स्पर्धेत १२० हून अधिक अँगलर्स सहभागी होत असून, कौशल्य, संयम आणि अचूकतेची खरी परीक्षा येथे पाहायला मिळणार आहे. तीन सत्रांत खेळवली जाणारी ही स्पर्धा सकाळी आणि संध्याकाळी समुद्राच्या बदलत्या लाटांमध्ये रंगणार आहे. रील व रॉडच्या सहाय्याने गळाने मासे पकडण्याच्या कौशल्याची ही स्पर्धा आहे.
स्पर्धा एकूण तीन सत्रांमध्ये खेळवली जाणार आहे. २० डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या दोन सत्रांत, तर २१ डिसेंबर रोजी सकाळी ६ ते दुपारी १ या सत्रात स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत पकडलेल्या मास्यांच्या प्रजातींनुसार गुणांकन करण्यात येणार असून, मास्याची लांबी मोजून त्यानुसार गुण (पॉईंट्स) संबंधित स्पर्धकाला देण्यात येणार आहेत. या गुणांच्या आधारे विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
२१ डिसेंबर रोजी सायंकाळी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून प्रथम पारितोषिक रोख ५०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स, द्वितीय पारितोषिक रोख ४०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स, तृतीय पारितोषिक रोख ३०,००० रुपये, ट्रॉफी व टॅकल्स देण्यात येणार आहे. याशिवाय पहिला कॅच, जास्त कॅच, तसेच महिला स्पर्धकांसाठी विशेष बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. या स्पर्धेमुळे कोकणातील सर्फ फिशिंगला चालना मिळत असून, साहसी खेळप्रेमी अँगलर्ससाठी ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

Subscribe to my channel




