तारकर्ली दुर्घटना : आमदार, खासदार, पालकमंत्र्यांच्या ढिसाळ कारभाराचा कळस !

सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांची टीका ; आ. वैभव नाईकांनी भेट देण्याचे सौजन्यही दाखवले नाही

तारकर्लीत प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यावश्यक असताना साध्या प्रथमोपचार सुविधाही नाहीत

कुणाल मांजरेकर

मालवण : तारकर्लीच्या समुद्रात घडलेली दुर्घटना ही आमदार, खासदार आणि पालकमंत्र्यांच्या ढिसाळ कारभाराचा कळस असल्याची टीका भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी केली आहे. तारकर्ली, देवबाग ही गावे पर्यटन दृष्टीकोनातून सुप्रसिद्ध व वर्दळीची ठिकाणे आहेत. जिल्ह्यामध्ये येणारा प्रत्येक पर्यटक हा तारकर्ली, देवबागमध्ये राहण्यासाठी आणि वॉटर स्पोर्टस, स्कुबा, पॅरासिलिंग इत्यादी गोष्टींचा आस्वाद घेण्यासाठी येतो. एवढे मोठे पर्यटनस्थळ असल्याने वास्तविक येथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची सुविधा असणे गरजेचे होते. मात्र सत्ताधारी या ठिकाणी साध्या प्रथमोपचारासाठी सोयी सुविधा उपलब्ध करू शकत नाहीत, हे मालवणवासीय व कोकणवासीयांचे दुर्देव आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पर्यटनापासून शासनाला लाखो रूपयांचा महसूल मिळतो. पण त्या बदल्यात राज्यकर्ते पर्यटकांना सुखसोयी व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देतात का ? प्रत्यक्षात या सर्व गोष्टींकडे राज्यकर्ते जाणून बुजून दुर्लक्ष करतात. तारकर्ली, देवबाग हे गाव पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक भेट देतात. जर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असले असते तर देशमुख व पिसे कुटुंबातील दोन कर्त्या पर्यटकांचा मृत्यू झाला नसता व सदरील दुर्दैवी अनर्थ टळला असता. या अपघातग्रस्त पर्यटकांना रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यासाठी सुमारे दिड तास विलंब झाला. तोपर्यंत सर्व काही संपले होते. ते दोन पर्यटक गुदमरून, फुफुसात मातीयुक्त पाणी जाऊन श्वास कोंडून मरण पावले. त्यांच्यावर तात्काळ प्रथमोचार स्थानिक पातळीवर झाले असते तर पर्यटकांचे प्राण वाचले असते, असेही श्री. आचरेकर म्हणाले.

आ. वैभव नाईकांना गांभीर्य नाही

ज्यावेळी २० पर्यटकांची तारकर्ली येथे होडी बुडाली. त्यावेळी जवळपास १० ते १२ पर्यटक रुग्णांना ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता अपुऱ्या सुविधेमुळे काही पर्यटकांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागले. ग्रामीण रुग्णालयामध्ये व्हेंटीलेटरची सुविधा व इतर सुविधा नसल्यामुळे ग्रामीण रूग्णालयाने रूग्णांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्वरीत उपचार मिळाल्याने पुढील अनर्थ टळला, नाहीतर मोठ्या प्रमाणात जीवीतहानी झाली असती. ग्रामीण रुग्णालयात व्हेंटीलेटर, ऑक्सिजन इत्यादी इर्मजन्सी सुविधा उपलब्ध झाली असती तर अनर्थ टळला असता. एवढे सगळे घडूनही स्थानिक आमदारांना गांभीर्य नाही. ते घटनास्थळी भेट देवू शकले नाही. परिस्थितीची माहिती घेवून पर्यटकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करायला त्यांना वेळ नाही, असे सांगून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, जिल्हास्तरीय प्रशासनाने भेट देवून या घटनेची चौकशी करीत नातेवाईकांचे सांत्वन केल्याचे आचरेकर, पाटकर म्हणाले. दुर्घटनाग्रस्त भागामध्ये वर्षातून एकदा तरी अशा घटना घडतात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची सुविधा राज्यकर्ते देवू शकत नाहीत. त्यामुळे स्थानिक आमदार, पालकमंत्री, खासदार लोकांच्या व पर्यटकांच्या जिवाशी खेळत आहेत. त्यांना महसूलाच्या नावाखाली लाखो रूपये गोळा करतात येतात. परंतु या राज्यकर्त्यांना हॉस्पिटलच्या सोयी सुविधा देता येत नाही, अशीही टिका श्री, आचरेकर यांनी केली.

पर्यटन व्यवसाय अटीशर्तींसह सुरू करावा ; निर्बंध ठेवा, पूर्ण बंदी नको

स्थानिक पर्यटक व्यावसायिकांना लाईफ जॅकेटची सुविधा शासनाने उपलब्ध करून देणे गरजेचे होते. परंतु काही अपरिहार्य कारणांनी व काही अतिउत्साही पर्यटकांमुळे सुद्धा लाईफ जॅकेट घालणे टाळतात. लाईफ जॅकेट घालणे बंधनकारक केल्यास व तसेच कडक निर्बंध पर्यटक व्यावसायिकांवर घातल्यास अशा प्रकारचे अपघात टळू शकतात. प्रशासनाने व राज्य सरकाराने एका व्यावसायिकाच्या चुकीचा फटका इतरांना बसू देऊ नये. निर्बंध घालावेत. परंतु पर्यटन व्यावसायिकांना विस्थापिक करू नये. त्यामुळे शेकडो पर्यटन व्यावसायिकांचे उद्योग धंदे बंद होतील, व ते कर्जबाजारी होवून विस्थापित होतील शेतकऱ्यांसारखी त्यांची स्थिती होईल. तोक्ते वादळाने मच्छीमार समाजाचे व पर्यटन व्यावसायिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होवून पर्यटन व्यवसाय मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे त्यांचे संसार वाचवावे व पर्यटन व्यवसाय पूर्ववत अटी – शर्ती घालून चालू करावा, असेही श्री. आचरेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!