आ. निलेश राणेंची यशस्वी मध्यस्थी : तळाशीलवासीयांचे आंदोलन नवव्या दिवशी मागे

कालावल खाडीतील बेकायदा वाळू उपसा कायमचा बंद होणार : आ. निलेश राणे यांचे आश्वासन

मालवण : कालावल खाडीपात्रातील तळाशील समोर शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर दरम्यान बेकायदेशीर वाळू उपसा बंद करावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील वासियांनी छेडलेल्या आंदोलनाला नवव्या दिवशी यश आले. आमदार निलेश राणे यांच्या मध्यस्थीने आज ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत प्रशासकीय अधिकारी व तळाशील ग्रामस्थ यांच्यात बैठक झाल्यानंतर सायंकाळी आमदार निलेश राणे यांनी तळाशील येथे आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे कालावल खाडीपात्रात शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या खाडीपट्ट्यात वाळू उपसा होणार नाही व यापुढे वाळू उपसा करण्यास परवानगी मिळणार नाही, असा शब्द दिला. तसेच येथील किनारपट्टीची धूप रोखण्यासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचे बंधारे मंजूर झाले असून यातील एका बंधाऱ्याचे वर्कऑर्डरचे पत्रच निलेश राणे यांनी ग्रामस्थांना सुपूर्द केले. तर दुसरे पत्र उद्या किंवा परवा देऊ, असे सांगितले. अन्य मागण्यांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने तळाशील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.

कालावल खाडी पात्रातील तळाशीलसमोरील बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई होऊन तो बंद व्हावा यासह अन्य मागण्यांसाठी तळाशील ग्रामस्थांनी गेले आठ दिवस कालावल खाडी पात्रात होड्यांमध्ये बसून तसेच तळाशील खाडी किनारी बसून आंदोलन छेडले होते. मागण्या मान्य होत नसल्याने काल सायंकाळी या आंदोलनाला उग्र स्वरूप प्राप्त होऊन तळाशीलच्या महिला थेट खाडीपात्रात उतरल्या होत्या. या दरम्यान दोन महिलांची प्रकृती अत्यवस्थ बनली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, आमदार निलेश राणे, प्रांताधिकारी, महसूल व बंदर विभाग अधिकारी आणि तळाशील ग्रामस्थांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक संपन्न झाली. त्यानंतर सायंकाळी आम. निलेश राणे यांनी तळाशील येथे आंदोलनस्थळी ग्रामस्थांची भेट घेऊन संवाद साधला. यावेळी तळाशीलच्या महिलांनी मागण्यांचे निवेदन आम. निलेश राणे यांना सादर केले. त्यानंतर आमदार राणे यांनी बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, प्रांतधिकारी ऐश्वर्या काळुसे, नायब तहसीलदार प्रिया हरणे, पतन विभागाच्या पुजारे, तोंडवळीच्या सरपंच, तळाशील ग्रामविकास समितीचे अध्यक्ष संजय केळूसकर, बाबा परब, रविकिरण तोरसकर, पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर, आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस आदी व इतर उपस्थित होते.

वाळू उपशामुळे तळाशील गावाची खाडीकिनाऱ्याकडील जमीन खचत चालल्याने तळाशीलच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने रेवंडी शेलटी जेटी ते सर्जेकोट बंदर या खाडी पट्ट्यातील वाळू उपसा कायमचा बंद व्हावा या ग्रामस्थांच्या मागणीवर आम. निलेश राणे यांनी शेलटी जेटी ते सर्जेकोट या पट्ट्यात वाळू उपसा करण्यासाठी कायदेशीर परवानगी नसल्याने येथे यापुढे वाळू उपसा होणार नाही, मी असेपर्यंत तरी येथे वाळू उपसा करण्यास कोणतीही परवानगी मिळणार नाही, असेही आमदार निलेश राणे म्हणाले.रेवंडी जेटी येथे वाळूने भरलेल्या बोटी निदर्शनास आणून देखील त्याच्यावर कारवाई न होता त्या पळविण्यात आल्याने त्याप्रकरणी गुन्हा दाखल व्हावा तसेच या बोटींचा पंचनामा करतो सांगून तो न करणाऱ्या बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व्हावी, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या. याबाबत आमदार निलेश राणे यांनी आपण याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना दिली असून तो दाखल होईल. गुन्हा दाखल झाल्यावर बंदर अधिकाऱ्यांबाबत पोलीस योग्य तो तपास करून यात दोषी कोण आहे हे तपासले जाईल व त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन आमदार निलेश राणे यांनी दिले.

तसेच ग्रामस्थांच्या मागणीप्रमाणे तळाशील समोरील खाडीपात्रात अवैध वाळू उपसा होणार नाही यावर देखरेख ठेवण्यासाठी व कारवाई करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स तैनात करण्याबाबत जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने योग्य व कडक स्वरूपातील कार्यवाही करावी, अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. तसेच तळाशील खाडी किनारी व समुद्र किनारी बंधाऱ्याची कामे लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन श्री. राणे यांनी दिले. तळाशील समोरील खाडीतील वाळू उपसा बंद करण्याबरोबरच इतर मागण्यांबाबत आमदार निलेश राणे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिल्याने तळाशील ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले.

error: Content is protected !!