प्रफुल्ल देसाई यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर

ग्रंथपाल म्हणून ३० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; २४ नोव्हेंबरला पुण्यात होणार सन्मान

मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रफुल्ल वसंत देसाई यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शैक्षणिक वर्ष २०२६ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या २४ नोव्हेंबर रोजी पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

CFTUI संलग्न या संघटनेच्या वतीने दरवर्षी शिक्षण क्षेत्रात निष्ठेने, समर्पित भावनेने आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी प्रफुल्ल देसाई यांची निवड झाल्याचे अधिकृत पत्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष गायकवाड, प्रदेश सचिव सत्यजीत जानराव आणि प्रदेश संघटक नईम इनामदार यांनी पाठविले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पुणे रेल्वे स्टेशनजवळील मालधक्का परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. प्रफुल्ल देसाई हे गेली ३० वर्षे मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय कट्टा येथील वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आणि वायरी येथील रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या ग्रंथपाल पदाची जबाबदारीही ते सांभाळत आहेत. तीन दशकांच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी ग्रंथालय व्यवस्थापन आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय सन्मान जाहीर झाला आहे.

या पुरस्काराबद्दल भंडारी एज्युकेशन सोसायटी (मालवण), मुंबईचे अध्यक्ष विजय पाटकर, ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, सेक्रेटरी सुनील नाईक, विजयश्री देसाई, मुख्याध्यापिका देवयानी गावडे आणि संस्थेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही देसाई यांचे अभिनंदन केले. रेकोबा हायस्कूल, वायरीचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांच्यासह संस्थाचालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!