रविवारी सायंकाळी ७.३० वाजता कार्यक्रम; भक्तिरसाचा अनुभव घेण्याची रसिकांना संधी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण बीच कला महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी ११ ऑक्टोबर सायंकाळी ७.३० वाजता ‘देवधून – भक्तिरस, एक अद्भुत संगीत रजनी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱ्याच्या निसर्गरम्य वातावरणात भक्तिसंगीताची सुरेल मैफल अनुभवण्याची संधी यानिमित्ताने संगीतप्रेमी आणि भक्तिरसिकांना मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या बीच कला महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत आयोजित ‘देवधून’ या कार्यक्रमातून भक्ती, संगीत आणि सुरांचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.समुद्राच्या लाटांचा नाद आणि भक्तिसंगीताचे मधुर सूर यांच्या संगतीत रंगणाऱ्या या संगीत रजनीमुळे मालवणच्या सांस्कृतिक वातावरणात भक्तिरसाची अनुभूती घेता येणार आहे. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.