आमची कोणाशीही स्पर्धा नाही, भाजपची विजयाची परंपरा अखंडित सुरु ठेवणार, नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदाच्या जागांवर भाजप शतप्रतिशत यश मिळवेल : जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा विश्वास


मालवण : मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्व:बळाचा नारा देत रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करून नगराध्यक्ष पदासाठी सौ. शिल्पा यतीन खोत यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले. आमची कोणाशीही स्पर्धा नाही, भाजपची विजयाची परंपरा अखंडित सुरु ठेवायची असून मालवणात नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवक पदाच्या जागांवर भाजप शतप्रतिशत यश मिळवेल, असा विश्वास यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला.
मालवण भाजप कार्यालय ते नगरपालिका अशी रॅली काढत आणि घोषणाबाजी करत भाजपाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शहराध्यक्ष बाबा मोंडकर, रणजित देसाई, सुदेश आचरेकर, मंदार केणी, महेश मांजरेकर, गणेश कुशे, यतीन खोत, विजय केनवडेकर, बाबा परब, आपा लुडबे, पूजा वेरलकर, महानंदा खानोलकर, अन्वेषा आचरेकर, ललित चव्हाण, सन्मेष परब, सेजल परब, राजू परुळेकर, दर्शना कासवकर, विकी तोरसकर, सौरभ ताम्हणकर, अनिकेत फाटक, संतोष शिरगांवकर, अमृता फाटक, तारका चव्हाण, आबा हडकर, महिमा मयेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, भाजप पक्षात आम्हाला चांगली मंडळी मिळाली आहेत. सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मेहनतीमुळेच प्रत्येक निवडणुकीत यश खेचून आणले, म्हणूनच नेतृत्व म्हणून माझ्या मागे यशस्वी जिल्हाध्यक्ष असे विशेषण लावले जाते. उर्वरित कालावधीत देखील कार्यकर्ते अशीच मेहनत करून यश मिळवतील अशी मला खात्री आहे. मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजप स्व:बळावर २० नगरसेवक पदासाठी उमेदवार आणि नगराध्यक्ष पदावर उमेदवार उभा केला आहे. ज्या प्रमाणे लोकसभा निवडणुकीत सांगितल्या प्रमाणे मताधिक्य रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात आम्ही दिले आणि खासदार नारायण राणे विजयी झाले, विधानसभा निवडणुकीत देखील युतीतील तिन्ही आमदारांना चांगल्या मताधिक्याने निवडून आणले. विजयाची ही परंपरा मालवण नगरपालिका निवडणुकीतहीं अखंडित सुरु ठेवायची आहे, यासाठी सर्व स्थानिक नेते एकदिलाने काम करत आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अकरा वर्ष सत्ता आहे बिहारच्या विजयानंतर देशात २० पेक्षा जास्त राज्यात भाजपाची सत्ता आहे, यशाचा हा सुगंध पुढे घेऊन जाताना आनंद होत आहे. जिल्ह्यातील चारही नगरपालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर लढत आहे. चारही ठिकाणी भाजपची सत्ता येईल. जनता विकासाची भुकेलेली आहे. आमची स्पर्धा कोणाशीही नाही, विकासाशी आमची स्पर्धा आहे, कोणाशी स्पर्धा करण्यापेक्षा विकासाशी स्पर्धा केली पाहिजे, हेच भाजपचे ब्रीदवाक्य आहे. आजपर्यंत जे दिले त्यापेक्षा चांगल देण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. पालकमंत्री नितेश व खासदार नारायण राणे आमच्या पाठीशी आहेत. प्रदेशाध्यक्ष व मालवणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे देखील लक्ष ठेवून असून त्यांचेही मार्गदर्शन मिळत आहे, मालवणात नगराध्यक्ष व २० नगरसेवक जागावर भाजप शतप्रतिशत यश मिळवेल, असेही प्रभाकर सावंत म्हणाले. तसेच मालवण मध्ये भाजपकडून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाची उमेदवारी निश्चित करताना तोडीस तोड उमेदवार होते, पण पक्षाच्या आदेशानुसार काहींनी थोडेसे थांबून काम करण्याचे मान्य केले, त्यांचे आम्ही आभार मानतो, असेही प्रभाकर सावंत म्हणाले. यावेळी धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन महेश मांजरेकर यांनी केले.

Subscribe to my channel




